Last Updated by संपादक
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रूग्णालयात होणा-या कोरोनाग्रस्त
रूग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमर दगडूसाहेब देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना बुधवार,दिनांक 23 सप्टेंबर रोजी पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अमर दगडूसाहेब देशमुख यांनी पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे दुर्दैवाने वाढत चालले आहे.कोरोनाग्रस्त रूग्ण उपचार घेत असताना डॉक्टरांद्वारे उपचारामध्ये निष्काळजीपणा दिसून येत आहे.रूग्णांच्या नियमित तपासण्या व लागणारी औषधे रूग्णास मिळत नाहीत.त्यामुळे सौम्य लक्षणे असणारे रूग्णांचे गंभीर आजारात रूपांतर होऊन मृत्यू होत आहेत.ग्रामीण भागातील शेतकरी,मोलमजुरी करणा-यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात भरती केले जाते.मृत्यू होणा-यामध्ये शेतकरी,मजूर व काबाडकष्ट करणारे गरीब लोकांचे प्रमाण हे अधिक आहे.रूग्णांचे होणारे मृत्यू हे तपासणी व उपचार यांच्या अभावी होत आहेत.तरी आजपर्यंत झालेल्या मृत्यूंची सखोल चौकशी जिल्ह्याबाहेरच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत करून दोषींविरूध्द योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अमर दगडूसाहेब देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.सदरील निवेदन हे ई-मेल आणि पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहे अशी माहिती अमर देशमुख यांनी दिली आहे.निवेदनाच्या प्रती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री,वैद्यकीय शिक्षण मंत्री,पालकमंत्री,बीड.,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव आणि संचालक,जिल्हाधिकारी,बीड यांना माहीतीस्तव देण्यात आल्या आहेत.