एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहता कामा नये – ना.अब्दुल सत्तार यांचे निर्देश
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी शनिवारी पाहणी केली.कोरोनाचे संकट कायम असले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अतिवृष्टीमुळे झालेल्या संपूर्ण बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे पूर्ण करा,पंचनामे करीत असताना एकही नुकसान ग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहता कामा नये असे निर्देश ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
सोयगाव तालुक्यातील कंकराळा, माळेगाव, बहुलखेडा,जरंडी, निंबायती, बनोटी इत्यादी भागात अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत ना. अब्दुल सत्तार यांनी प्रारंभी सोयगाव येथे तहसिल कार्यालयात याबाबत आढावा बैठकित झालेल्या नुकसानीचा आढावा जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, विधानसभा प्रमुख दिलीप मचे, जि.प.च्या महिला बालकल्याण सभापती मोनाली राठोड, डॉ. अस्मिता पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या धृपताबाई सोनवणे,जि.प. सदस्य गोपी जाधव, शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडखे,पंचायत समिती सभापती रुस्तुलबी उस्मान खाँ पठाण,उपनगराध्यक्षा मंगलाबाई राऊत,पंचायत समिती सदस्य धरमसिंग चव्हाण, आर.एस.पवार,शिवसेना नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन,संजय मुटकुटे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, चंदाबाई राजपूत, राजमल पवार,नितीन बोरसे, जामटी राधेश्याम जाधव आदींसह महसूल,कृषी व विविध प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलताना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की , सोयगाव तालुक्यात पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या पंचनामा मध्ये 665 हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहेत. या अतिवृष्टीमुळे जवळपास 40 घरांचे नुकसान झाले असून आतापर्यंत शेतकऱ्यांचे 17 जनावरे पाण्यात वाहून गेले आहेत. तालुक्यात पंचनामे करण्याचे काम अविरत सुरू असून कोरोनाचे संकट जरी असले तरी गरज पडल्यास आम्ही कर्ज घेवू पण शेतकऱ्यांना नुकसानीची मदत देऊ असा विश्वास ना. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
सोयगाव तालुक्यातील नुकसान पाहणी दरम्यान ना. अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पिकांची पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी आपला प्रोटोकॉल बाजूला ठेवून पायात बूट किंवा चप्पल न घालता गाऱ्यात पाय फसत असतांनाही तेथील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून प्रत्येक नुकसान ग्रस्तांना न्याय मिळेल अशा शब्दात शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले.
सोयगावला झालेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या धुडगूसचा प्रश्न उपस्थित केला असता,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ बैठकीला अनुपस्थित असल्याने तातडीने या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत तहसीलदार प्रवीण पांडे यांना अनुपालानाच्या सूचना देवून आढावा बैठकीच्या ठरावात या अधिकार्याच्घी गैरहजेरी घेवून वनमंत्री संजय राठोड यांचेशी दूरध्वनीवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट संपर्क साधून या अधिकाऱ्याला निलंबित करण्याबाबत शिफारस केली आहे.त्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.