सोयगाव: जरंडीजवळील अपघातात बहुलखेड्याचा एक ठार ,तासभर मृतदेह रस्त्यावर पडून

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― भरधाव अज्ञात वाहनाने समोरून येणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला चिरडून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता सोयगाव-बनोटी रस्त्यावर जरंडीजवळ घडली.या अपघातातील २३ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे.

सोयगावकडून बहुलखेडा गावाकडे मोटारसायकल क्रमांक-एम,एच-२० के-२३३४ वरून जाणाऱ्या तरुणाला अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.राहुल छगन जाधव(वय २३) असे मृताचे नाव आहे.बहुलखेडाकडे जात असतांना जरंडी जवळ हा अपघात झाला.याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मृतदेह तासभर रस्त्यावर पडून –

अज्ञात वाहनाने चिरडून ठार झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह तासभर रस्त्यावर अंधारातच पडून होता.या मृतदेहाला घेवून जाण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नव्हत्या.ऐनवेळी आलेल्या १०८ च्या रुग्णवाहिकेला मृतदेह घेवून जाण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने अखेरीस जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका घटनास्थळी पोलिसांनी पाचारण केली.घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांचेसह पथक घटनास्थळी पोहचले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

घटनास्थळी जरंडी,निंबायती आणि बहुलखेडा या दोन्ही गावांच्या नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याने सोयगाव-बनोटी रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती अखेरीस पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून रस्ता मोकळा करून दिला,मृताचे रात्री शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,उपनिरीक्षक युवराज शिंदे,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,विकास लोखंडे आदी करत आहे.

दोन मिनिटापूर्वीच अपघातग्रस्त कुटुंबियांशी बोलला

अपघातात चिरडून ठार झालेला तरुण राहुल जाधव हा अपघात होण्याच्या दोन मिनिटे आधीच जरंडी गावाजवळ असल्याचे सांगून मोबाईलवरून बोलला असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.