अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे कोविड रूग्णांची सेवा
करणा-या डॉ.नूतन जोशी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सुपरस्पेशालिटी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक पटकावून देशात अंबाजोगाईचे नांव उंचावल्याबद्दल डॉ.नूतन जोशींचा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी शनिवार,दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सत्कार केला.
अंबाजोगाई शहरातील सहकार भवन येथे शनिवारी डॉ.नूतन दामोदरराव जोशी यांचा फेटा बांधून,शाल व वृक्षरोप भेट देऊन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी आणि पञकार प्रशांत बर्दापूरकर यांचे हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.नूतन जोशी यांचे वडील दामोदरराव जोशी,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक सुनील व्यवहारे, नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण, विजय रापतवार,मुख्याध्यापक आनंद टाकळकर, महेश अकोलकर,प्रा.संकेत तोरंबेकर,केदार दामोशन आदींची उपस्थिती होती.प्रारंभी सुञसंचालन करताना मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी सांगितले की,नुकत्याच 15 सप्टेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील हेमॅटॉलॉजी सुपरस्पेशालिटी परीक्षेत लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल मुंबई येथे सेवेत असलेल्या डॉ.नूतन जोशी यांनी भारतात प्रथम क्रमांक पटकावला.त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे येथील योगेश्वरी कन्या शाळेत झाले आहे.शालेय जीवनापासून ते वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात त्यांनी आग्रक्रम ठेवला.तिने मुंबईच्या सायन वैद्यकीय
महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.पदवी गुणवत्तेत पूर्ण केली आहे.त्यांना काव्यरचना करण्याचा छंद आहे.अनेक समाजोपयोगी कामात त्यांनी हातभार लावला आहे.डॉ.नूतन जोशी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आज अंबाजोगाई पिपल्स को ऑप.बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी साहेबांकडून सत्कार करण्यात येत आहे.सत्काराला उत्तर देताना डॉ.नूतन जोशी यांनी सांगितले की,प्रियदर्शनी क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणा-या बालझुंबडच्या ज्या विविध स्पर्धा होतात.त्या स्पर्धेतील मी 7 ते 8 वेळा विजेती आहे.प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.बालझुंबड मुळेच मला सतत प्रोत्साहन मिळाले.त्यामुळे बालझुंबडचे संयोजक
राजकिशोरजी मोदी यांचे मी आभार मानते.आपणावर अंबाजोगाईत संस्कार झाले असल्याचे सांगत वैद्यकीय क्षेत्रात यापुढेही रूग्णसेवेच्या माध्यमातून कार्यरत राहून गरजूंची सेवा करू अशी ग्वाही डॉ.नूतन जोशी यांनी दिली.उपस्थितांचे आभार राणा चव्हाण यांनी मानले.
डॉ.नूतन जोशींची अभिमानास्पद कामगिरी..!
डॉ.नूतन जोशी या अंबाजोगाईचे रहिवासी श्री दामोदरराव व सौ.वंदनाताई जोशी यांच्या सुकन्या तर राहुल दादा यांची भाच्ची आहे.प्रथम आपणा सर्वांचे अभिनंदन.कारण,सुपर स्पेशालिटी साठीच्या नीट परीक्षेत देशातून पहिला क्रमांक येणे हे अंबाजोगाईकरांसाठी निश्चितच भूषणावह बाब आहे.आज कोवीडमुळे संपूर्ण जग संकटात आहे.या काळात डॉक्टर कोवीड योद्धे बनून आपल्या जिवाचे रान करून लढत आहेत.आपल्या अंबाजोगाईच्या व लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत असलेल्या योद्धा डॉ.नूतन जोशी यांनी तमाम अंबाजोगाईकरांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी केली आहे.नुकतीच राष्ट्रीय पातळीवरील हेमॅटॉलॉजी सुपर स्पेशालिटी या परीक्षेत अंबाजोगाईकर डॉ.नूतन जोशी भारतात प्रथम आल्या आहेत.ही परीक्षा त्यांनी कोवीड संकटकाळात मुंबई येथील सेव्हन हिल्स रूग्णालयात एक डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावताना दिली.ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.आपल्या अंबाजोगाईची मुलगी इतक्या मोठ्या परीक्षेत देशात पहिली आली ही आपल्या तमाम अंबाजोगाईकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.अंबाजोगाईच्या कन्येचे संपूर्ण अंबाजोगाईकरांतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
―राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)