सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव आणि जरंडी या दोन्ही महसुली मंडळात शुक्रवारी मध्यरात्री अवकाळीच्या सरी कोसळल्याने पुन्हा पिकांना जलसमाधी घेण्याची वेळ आली असून,ऐन कापूस वेचणीच्या काळात शेतांमध्ये चिखल झाला आहे.दोन्ही मंडळातील काही गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपल्याने वेचणी वर आलेला कापूस पुन्हा भिजला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे कापूस पिकांचे नुकसान झाले आहे.
सोयगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते,या अतिवृष्टीच्या पावसाने सप्टेंबर २८ ला उघडीप घेतल्यानंतर मात्र सोयगाव तालुक्यात कापूस पिकांच्या पहिल्या वेचण्या हाती घेण्यात आल्या असतांना अचानक पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने पुनः या कापूस पिकांना धोका झाला असून यामध्ये अवकाळी पावसाच्या सरींमुळे वेचणी करण्यात येणारा कापूस भिजला आहे.आधीच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कापूस पिकांच्या कैऱ्या झाडावरच कुजल्या असून यामध्ये कापसाचे वजनही घटले असतांना पुन्हा अवकाळीचं तडाख्यात कापूस पिके भक्षस्थानी सापडला होता.जरंडी महसुली मंडळात सहा तर सोयगाव महसुली मंडळात २ मी.मी अवकाळी पावसाची पहिली नोंद झाली आहे.
बहुलखेड्यात अवकाळीचा जोर अधिक―
जरंडी महसुली मंडळातील बहुलखेडा ता.सोयगाव परिसरात अवकाळी पावसाचा जोर अधिक होता त्यामुळे या भागातील कापूस पिके जास्त प्रमाणात भिजली असून ऐन वेचणीचं काळात कापूस भिजला आहे.त्यामुळे शुक्रवारी बहुलखेडा शेतातील चिखलामुळे काही भागात कापूस वेचणी बंद होती.