संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
निधी उपलब्ध असताना देखील कोरोना बाधित रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी रूग्ण व नातेवाईकांकडून आम्हास प्राप्त होत आहेत.तरी कोरोना बाधित रूग्णांना शासनमान्य निर्देशानुसार उपचार करावेत या बाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.अन्यथा या प्रश्नी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामिण रूग्णालय प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन करावे लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी उपजिल्हाधिकारी यांना बुधवार,दि.7 ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,स्वाराती रूग्णालयाच्या वतीने कोरोना बाधित रूग्णांवर शासन नियमानुसार उपचार होत नाहीत.योग्य ती औषधे दिली जात नाहीत,ज्या रूग्णांना सौम्य अथवा तीव्र लक्षणे आहेत त्यांच्या तपासण्या होत नाहीत,कोरोनाबाधीत रूग्णांचा सिटीस्कॅन,एक्स-रे न करताच अर्धवट उपचार दिला जातो,गंभीर रूग्णांना रेमेडिसीवरचे इंजेक्शन दिले जात नाही,रूग्णांना वेळेवर ऑक्सीजन मिळत नाही,त्यामुळे रूग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.रूग्णांना विटामिनच्या गोळ्या उपलब्ध होत नाही,तज्ञ डॉक्टर वॉर्डात राऊंड घेत नाहीत,गंभीर रूग्णांना प्लॉझ्मा देण्यासाठी नियमावली असताना आजपर्यंत एकाही रूग्णाला प्लाझ्मा दिला गेला नाही.या बाबत स्वाराती रूग्णालयात अनेक बाबींचा अभाव दिसून येत आहे.तरी योग्य ते औषधोउपचार करून कोरोना बाधित रूग्णांना तात्काळ योग्य आरोग्य सुविधा देण्यात याव्यात.अन्यथा या प्रश्नी संभाजी ब्रिगेडच्या वतीने रुग्णालय प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उत्तमराव ठोंबरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर प्रवीण ठोंबरे,गणेश शिंदे,लहुजी शिंदे,संतोष ढवळे,विशाल माने,दत्ताञय फपाळ आदींच्या स्वाक्ष-या आहेत.