ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

नुकसानीचे खोटे पंचनामे सहन करणार नाही, अन्यथा रस्त्यावर उतरू –पंकजाताई मुंडे

शेतकऱ्यांच्या पिकांची माती झाली, दिवाळीपूर्वी त्यांना मदत द्या - पंकजाताई मुंडे

गंगाखेड दि.२०:आठवडा विशेष टीम― अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांची पार माती झाली, त्यांच्यावर अस्मानी संकट तर ओढवलेच आहे पण प्रशासनाचे सुलतानी संकट ओढावू नये यासाठी नुकसानीचे पंचनामे योग्य झाले पाहिजेत, खोटे पंचनामे सहन केले जाणार नाहीत अन्यथा त्यासाठी रस्त्यावर उतरू असा सज्जड इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिला. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

अतिवृष्टीची पाहणी करून आल्यानंतर गंगाखेड जि. परभणी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. भाजपचे ज्येष्ठ नेते विजय गव्हाणे, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड रामप्रभू मुंडे, श्रीनिवास मुंडे, बीडचे राजेंद्र मस्के, निळकंठ चाटे, अक्षय मुंदडा आदी यावेळी उपस्थित होते.

मराठवाडयात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांची पार माती झाली आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकारने उभे राहिले पाहिजे. सरकारने बोलायचे एक आणि करायचे एक असे वागू नये. नुकसानीचे खरे पंचनामे करावेत, खोटे पंचनामे केल्यास रस्त्यावर उतरून त्याची होळी करू असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही विरोधी पक्षात असताना जेवढी मदत शेतकऱ्यांसाठी मागत होता, तेवढी मदत आता करा असे सत्ताधाऱ्यांना उद्देशून त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिला.

अन् पंकजाताईंना पाहताच शेतकऱ्यांना
आला धीर !
-------------------------
नांदेडचा दौरा आटोपून पंकजाताई आपल्या भेटीसाठी येणार असल्याचे समजताच गंगाखेड येथे हजारो शेतकरी त्यांची आतुरतेने वाट पहात होते. पंकजाताई यांचे आगमन झाले आणि त्यांना पाहताच उपस्थित शेतकऱ्यांना मोठा धीर आला. पंकजाताई यांनी यावेळी अतिशय आपुलकीने त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व मदतीचे आश्वासन दिले.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.