Last Updated by संपादक
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झालेले असून त्यांच्या संसारावर नांगर फिरल्यागत अवस्था झाली.सरकार दुस-यांदा पंचनामे करून नेमकं काय करतं ? हा प्रकार म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखाच आहे.हे नाटक करण्यापेक्षा शेतक-यांचा सातबारा पहा आणि सरसगट आर्थिक मदत करा अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,यंदा महाराष्ट्रासह मराठवाड्यात सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाला.परतीच्या पावसाने कहर केला.मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.आज खरीप पिकांचे पूर्णतः शंभर टक्के एवढे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद,लातूर,परभणी,नांदेड,जालना,हिंगोली,बीड, औरंगाबाद एकूण मराठवाड्यात नाही.म्हटलं तरी तीस लाखापेक्षा अधिक हेक्टर शेती नुकसानीत आली.केवळ पिके वाया गेली असं नव्हे तर जास्त पाऊस पडल्याने उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात चक्क शेतक-यांच्या जमिनीच खरडून गेल्या आहेत.सोयाबीन,कापूस,
मका,तूर कुठलंही पीक पदरात पडलं नाही.खरं तर पहिल्या टप्प्यात शासनाने नुकसानीचे पंचनामे केले होते आणि त्या आधारावर दहा हजार रूपयांची घोषणा शेतक-यांना मदत म्हणून सरकारने केली.वास्तविक पाहता शेतक-यांचं लाखोंच्या घरात नुकसान असं झालं.तिथे दहा हजार रूपयांनी होणार तरी काय ? मात्र ही सुद्धा मदत केल्यानंतर अनेक प्रकारचे नाटकं सरकार करत असून शेतक-यांना देण्याची त्यांची नियत नाही ? हे आता स्पष्टपणे लक्षात येत आहे.दुस-यांदा पंचनामे करा आणि पुरावे सादर करा अशा प्रकारचा आदेश सरकारने काढणे,म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असं या पत्रकात कुलकर्णी म्हणाले.वास्तविक पाहता राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतक-यांना सरसगट मदत देताना पंचनाम्याचे नाटक बाजूला ठेवावेत.आणि सातबारा बघा,शेतक-यांना घोषणा केल्याप्रमाणे आर्थिक मदत द्यायला सुरूवात करा अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.खरं तर दिवाळी पूर्वी जर मदत केली तर कशीतरी दिवाळी शेतक-यांना गोड लागेल असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.