जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शिधापत्रिकाधारकांना दिवाळी गोड होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून अंत्योदय, बीपीएल, शेतकरी आदी योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना दिवाळीसाठी साखर वितरण करण्यात येणार होती त्यासाठी तहसील कार्यालयाच्या गोडावूनमध्ये साखरेचा पुरवठाही करण्यात आला परंतु सरकारी यंत्रणांच्या नियोजनाअभावी सोयगाव तालुक्यात दिवाळीला लाभार्थ्यांना साखरेचे वितरण झाले नसल्याने या लाभार्थ्यांना एक किलो साखरेसाठी आता दिवाळी होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आधीच हातावर आलेले मजूर,शेतकरी यांची परिस्थिती बिकट असतांना त्यातच शासकीय यंत्रणांनी नियोजन न केल्याने सोयगाव तालुक्यात साखरेचा पुरवठा झालेला नाही.त्यामुळे दिवाळी होण्याची वाट पाहण्याची लाभार्थ्यांवर वेळ आली आहे.या पात्र योजनेचे सोयगाव तालुक्यात २५००० च्यावर लाभार्थी आहे.यासाठी प्रती वीस रु किलो याप्रमाणे साखर वितरीत करण्यात येणार होती.परंतु तालुका पुरवठा विभागाने दिवाळीपूर्वी नियोजन न केल्याने साखरेचे वितरण बिघडले असून प्राप्त झालेली २०० क्विंटल साखर पुरवठा विभागात धूळखात पडून आहे.
सोयगाव तालुक्यात दुकानदारांना साखरेचा पुरवठाच नाही-
सोयगाव तालुक्यात असलेल्या ५८ स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाकडून दिवाळीच्या धान्य वाटपात साखरेचा पुरवठाच केलेला नसल्याने आता हि गोडावून मधील साखर दिवाळीनंतर लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.या प्रकरणी तालुका पुरवठा अधिकारी नाना मोरे यांचेशी मोबाईलवरून संपर्क साधला असता संपर्क झाला नव्हता.
दिवाळीची साखर मिळणार महिनाभराने-
दिवाळी सणासाठी लाभार्थ्यांना प्रतीकार्ड एक किलो याप्रमाणे साखर वितरण करण्याच्या सूचना असतांना मात्र दुकानदारांना साखरेचा पुरवठा झाला नसल्याची माहिती हाती आली असून मात्र आता लाभार्थ्यांना साखरेसाठी दिवाळीनंतर प्रतीक्षा करावी लागणार आहे.