अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील पिंपळा (धायगुडा) येथील मस्जीद मध्ये इमाम म्हणून काम करणारे इमाम शेख हुसैन अमीर हमजा पटेल यांच्या दोन मुलींना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पाञ ठरल्याबद्दल अंबाजोगाई पीपल्स बँकेने सत्कार करून कौतुक केले.यावेळी बोलताना चेअरमन राजकिशोर मोदी म्हणाले की,गुणवत्ते मध्ये जात-धर्म,गरीब-श्रीमंत कधीही आडवी येत नाही.कठोर परिश्रम करून शेख भगिनींनी प्रतिकूल परिस्थितीत कठोर अभ्यास करून परीश्रमातून कमावलेले हे यश कौतुकास्पद आहे.
पिंपळा धायगुडा (ता.अंबाजोगाई जि.बीड) या गांवचे रहिवाशी व इमाम म्हणून एका मस्जिद मध्ये काम करणारे इमाम शेख हुसैन अमीर हमजा पटेल यांच्या दोन मुली वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पाञ ठरल्या ज्यात कु.शेख अर्शिया हुसैन हिचा स्वा.रा.ती.वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस साठी तर कु.शेख बिल्कीस हुसैन हिचा एम.ए.रंगुनवाडा येथे बी.डी.एस.पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला.त्याबद्दल त्यांचा सहकार भवन येथे सोमवार,दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सत्कार करून पुढच्या वाटचालीसाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.मस्जिदचे इमाम म्हणून महिना पाच ते सहा हजार रूपये एवढा माफक पगार असणा-या परंतू,चांगले संस्कार करून योग्य मार्गदर्शन करणा-या आपले वडिल शेख हुसैन अमीर हमजा पटेल यांचे व शेख कुटुंबियांचे नांव दोन्ही मुलींनी उज्ज्वल केले आहे.याप्रसंगी कु.शेख अर्शिया हुसैन आणि कु.शेख बिल्कीस हुसैन यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,पञकार प्रशांत बर्दापूरकर आणि पञकार प्रकाश लखेरा यांचे हस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला.यावेळी शेख भगिनींचे वडील इमाम शेख हुसैन अमीर हमजा पटेल,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक धम्मपाल सरवदे,संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राणा चव्हाण,बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,दिनेश घोडके,सहशिक्षक विजय रापतवार,फहेमीद फारूकी,शेख मुक्तार,भारत जोगदंड,सचिन जाधव,जुनैद सिद्दीकी,प्रताप देवकर,अमोल मिसाळ आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूञसंचालन विजय रापतवार यांनी केले.सत्काराला उत्तर पालक पिता इमाम शेख हुसैन अमीर हमजा पटेल यांनी दिले.यावेळी पञकार प्रशांत बर्दापूरकर,नगरसेवक महादेव आदमाने यांची समायोचित भाषणे झाली.उपस्थितांचे आभार राणा चव्हाण यांनी मानले.
शेख भगिनींची अभिमानास्पद कामगिरी..!
अंबाजोगाईचे रहिवासी इमाम शेख हुसैन अमीर हमजा पटेल यांच्या दोन्ही कन्या यांनी अंबाजोगाईचे नांव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन कारण,वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एका सर्वसामान्य कुटुंबातील दोन्ही मुली एकाचवेळी पाञ ठरल्या.त्यांचे प्रवेश निश्चित झाले हे अंबाजोगाईकरांसाठी निश्चितच भूषणावह बाब आहे.आज कोवीडमुळे संपूर्ण जग संकटात आहे.या काळात सर्वच डॉक्टर बांधव हे कोवीड योद्धे बनून आपल्या जिवाचे रान करून संसर्गजन्य रोगाशी लढत आहेत.शेख भगिनींनी उज्ज्वल कामगिरी करत अंबाजोगाईकरांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी केली आहे.त्यांचे वडील हे एका मस्जीद मध्ये इमाम म्हणून काम करतात.प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलींना चांगले संस्कार देवून उच्च शिक्षणासाठी त्यांनी दिलेले प्रोत्साहन हे कौतुकास्पद आहे.आपल्या तमाम अंबाजोगाईकरांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे.अंबाजोगाईच्या दोन्ही कन्यांचे संपूर्ण अंबाजोगाईकरांतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक.)