राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परळी येथे धाडी ; 57 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने परळी तालुक्यात वसंतनगर तांडा आणि धारावती तांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या गावठी मद्य निर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच असताना बुधवार,दि.25 नोव्हेंबर रोजी धाडी टाकून 57 हजार 500/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण 3 गुन्हे दाखल केले असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड यांनी दिली.

बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सातत्याने धाडी टाकण्यात येतात.आता पर्यंत लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला.तसेच अनेकांवर गुन्हे ही दाखल करण्यात आलेले आहेत.राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी,केज, माजलगाव,धारूर,परळी,अंबाजोगाई हे सहा तालुके येतात.त्यामुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू विक्री,हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे याबाबत जनतेतून स्वागत होत आहे.सध्या मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020 निमीत्ताने आदर्श आचारसंहिता सुरू आहे.या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत परळी तालुक्यात वसंतनगर तांडा या ठिकाणी धाड टाकली.तसेच धारावती तांडा व परिसरात गस्तीवर असताना या दोन ठिकाणी केलेल्या कारवाई करीत एकूण 3 गुन्हे नोंदवले.सदर आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा-1949 अंतर्गत दोन्ही ठिकाणी एकूण गुन्हे 3 त्यात 3 बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.टाकलेल्या धाडीत 45 लिटर हातभट्टी,2440 लिटर रसायन,200 लिटरचे 12 बॅरल,1 टोपली आणि 4 घागरी असा एकूण 57 हजार 500 /-रूपये (अक्षरी सत्तावन्न हजार पाचशे रूपये) किंमतीच्या मुद्देमालाचा समावेश आहे.या दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड,जवान बी.के.पाटील, वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.