घोसला दि.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या कुटुंबाच्या अल्टो कारची स्टेरींग लाॅक झाल्याने पुलावरून पलटी झालेल्या गाडीतील चार जण गंभीर जखमी झाले तर दोन बालक सुखरुप असल्याची घटना वरठाण (ता.सोयगाव) येथील हिवरा नदी पुलावर गुरुवारी (ता.२६)दुपारच्या सुमारास घडली. जखमींवर पाचोरा (जि. जळगाव) खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोयगाव बनोटी राज्य रस्ता वरुन देवगाव (ता. पारोळा) येथील सहा जण गाडी क्रमांक MH 12 CD 8412 अल्ट्रो गाडीने सिल्लोड येथील नातेवाईकाकडे हळदीच्या कार्यक्रमाला जात असताना वरठाण येथील हिवरा नदी पुलाजवळ गाडी येताच गाडीची स्टेरींग लाॅक झाल्याने गाडी कथडे नसलेल्या पुलावरून वीस फूट खोल हिवरा नदी पात्रात जाऊन पडल्याने गाडीतील पृथ्वीराज गंगाराम पाटील (वय ३६), दामिनी पृथ्वीराज पाटील (वय ३२), मनिष धनराज पाटील (वय ३५), अमृता मनिष पाटील (२८) हे चार जण गंभीर जखमी पडले होते तर चार वर्षीय शिवाशु मनिष पाटील आणि दोन वर्षिय प्रियांशी मनिष पाटील या दोन बालकांना साधी खरचट देखिल लागली नसल्याने कुतूहलाचा विषय झाला आहे. अपघातानंतर झालेल्या जोराच्या आवाजाने रस्त्यावरून जाणारे लोक तसेच शेतकरी गोळा होत तातडीने जखमींना गाडीतुन बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच पुलाजवळ नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्याने वहातूक कोंडी होऊन रस्त्याच्या दुर्तफा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच बनोटी दुरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने वहातूक कोंडी फोडीत बनोटी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहीकेने जखमींना पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावर उपचार चालू असून प्रकृती स्थिर आहे. अपघाताची नोंद बनोटी पोलीस चौकीत घेण्यात आली आहे.