अंबाजोगाई – कृषी महाविद्यालयात भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिन वृक्ष लागवड करून संपन्न झाला. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीच्या निर्देशानुसार पाचव्या कृषी शिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे होते तर सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच वसंतराव मोरे, डॉ.अरुण कदम, डॉ.प्रताप नाळवंडीकर, डॉ.दीपक लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.ठोंबरे म्हणाले की, राष्ट्रीय कृषी धोरण निश्चित करण्यामध्ये भारतरत्न डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून केलेले कार्य कृषी संस्कृतीला बळकटी निर्माण करणारे होते. त्यांनी शेतकऱ्यांना झाडे लावा – झाडे जगवा, पाणी आडवा – पाणी जिरवा व याद्वारे पर्यावरण संतुलन राखले जावे असा संदेश त्यांनी राष्ट्राला दिला. डॉ.ठोंबरे पुढे असे म्हणाले की, वसुंधरा पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमा पूजनाने व परिसरात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन शिवार पाहणी करून करण्यात आली. कृषी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाचा वार्षिक कार्यक्रमाचे नियोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून व संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनातून यशस्वीपणे अविरत राबविण्यात येत आहे. ग्रामीण कृषी कवी राजेश रेवले यांनी वृक्ष संवर्धन व पर्यावरणविषयक कृषी शिक्षण दिनानिमित्त कविता सादर केली.
कृषी शिक्षणाचा । करूया जागर ।
कृषी अवतार । चला घेऊ ।
रात्रंदिन आम्हा । मातीचेच स्वप्न ।
मातीतून रत्न । काढूयात ।
गरज काळाची । शोधू वाण नवे ।
पाखरांचे थवे । टिपतील ।
चला आता सारे । होऊ कटिबद्ध ।
करूया समृद्ध । बळीराजा ।
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नरेशकुमार जायेवर यांनी तर आभार डॉ.नरेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुनील गलांडे, प्रा.सुहास जाधव, डॉ.विद्या तायडे, डॉ.योगेश वाघमारे, अनंत मुंडे, व्यंकटेश मगर, मनिषा बगाडे, माया भिकाणे, पूजा वावरगिरे, यादवराव पाटील व सय्यद इरफान यांनी विशेष परिश्रम घेतले.
सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य
कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई