अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवार,दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी पुकारलेल्या भारत बंदला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.हा बंद यशस्वी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांनी बंद मध्ये सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,अंबाजोगाई शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने यांनी केले आहे.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषि विधेयके मागे घ्यावीत या मागणीसाठी काँग्रेस नेत्या खा.श्रीमती सोनियाजी गांधी,नेते खा.राहूलजी गांधी,नेत्या प्रियंकाजी गांधी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने वेळोवेळी विविध निवेदने,आंदोलने,
धरणे,उपोषण करण्यात आले आहेत.राज्यातून 2 कोटी सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात हे काळे कायदे राबविणार नाही.अशी ग्वाही पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगळवार,दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी पुकारलेल्या भारत बंद शांततेत व कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार पाळावयाचा आहे.या बंद मध्ये कृषी विधेयकाचा विरोध करणा-या बीड जिल्ह्यातील काँग्रेस समविचारी मिञ पक्ष,व्यापारी,शेतमजूर,शेतकरी,कष्टकरी,मजूर वर्ग,युवक तसेच सर्व सामाजिक संघटना,राजकीय पक्षांनी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून बीड जिल्ह्यातील सर्व आस्थापने बंद ठेवून आंदोलनास सहकार्य करावे व देशाचा पोशिंदा असणा-या बळीराजाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,अंबाजोगाई शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने यांनी केले आहे.