ब्रेकिंग न्युज

सातपुड्याच्या डोंगराळ भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग

आठवडा विशेष टीम―

नंदुरबार, दि. ५ – आकांक्षित जिल्हा नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली युवकही आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करू लागले आहेत. इथले हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याने दुर्गम डोंगराळ भागात शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावात धिरसिंग आणि टेड्या पाडवी या दोन तरुण भावंडांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून स्ट्रॉबेरी लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे त्यांना इतर पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभदेखील होत आहे.

धिरसिंगला शिक्षण घेता आले नसले तरी शेतात परिश्रम करताना त्यांनी रात्री वाचनाची आवडही जोपासली. टेड्या याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शेतात सतत नवे प्रयोग करण्याची या दोघांना आवड आहे आणि त्यातूनच स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्याची कल्पना समोर आली.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  डाब येथे 2007 पासून स्ट्रॉबेरी लागवड होत आहे. मात्र शेतकरी पारंपरिक पद्धतीने ही लागवड करीत असल्याने त्यांना पूर्णत: यश आले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाबळेश्वर येथे शेती सहलीचे आयोजन केले. या सहलीत दोघा भावंडांनी सहभाग घेतला आणि मिळालेल्या संधीचा पूरेपूर उपयोग करीत आपल्याकडील वडिलोपार्जित जमिनीवर नव्या तंत्राने स्ट्रॉबेरीची लागवड केली.

  पूर्वी वडिलांच्या नावावरील 2 एकर आणि वनपट्टा म्हणून मिळालेल्या 4 एकर जमिनीवर गहू, हरबरा अशी पारंपरिक पिके घेतली जात असे. त्या जागी धिरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. काही भागात हरबरा आणि भगर लागवडदेखील केली आहे. त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी घेतलेले परिश्रम आणि केलेले प्रयत्नदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरले.

  त्यांनी नाशिक येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली. स्वत: मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनासाठी खर्च केला. शेती सहलीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथील तज्ज्ञ शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रक चिकट सापळ्यासारख्या पद्धतीचा अवलंब केला. त्याचा फायदा त्यांना मिळाला.

  धिरसिंग यांनी करार शेतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढविले आहे. इतर स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. पॅकेजिंगसाठी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या खोक्यांचा वापर करून स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येते. नंदुरबारच्या व्यापाऱ्यांनादेखील स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येत आहे. शेतीतील नवे तंत्र आणि सोबतीला असलेली प्रयोगशिलता यामुळे दोन्ही भावांनी स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात यश मिळविले आहे. आता त्यांना वेध लागले ते स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढवायचे आणि तिचे ब्रँडींग करून मोठ्या शहरापर्यंत पोहोचायचे!

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.