बीड जिल्हा

बीड :अंबाजोगाईत 15 तर माजलगावात 8 जणांवर अंत्यसंस्कार ; कोरोना बळी

आठवडा विशेष/बीड आयटी टीम-

अंबाजोगाई : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रविवारी कोरोना बळींचा उच्चांक झाल्याने जिल्हा चांगलाच हादरला. एकट्या अंबाजोगाईत 15 तर माजलगावमध्ये 8 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतू, आरोग्य विभागाकडे नोंदी न झाल्याने इतर ठिकाणी झालेल्या मृत्यूबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नव्हती.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयाचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. याच ठिकाणी एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे चित्र जिल्हावासीयांनी गत आठवड्यात पाहिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अंबाजोगाईकरांना हादरविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी 12 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर शनिवार व रविवारचे असे एकूण 14 मृतदेहांवर शहराजवळील मांडवा रोडलगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर एकावर मुंडेपीर स्मशानभुमीत दफणविधी करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी रणधीर सोनवणे, रमेश सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
तिकडे माजलगाव येथील कोविड रूग्णालयांमध्ये एकाच दिवशी तब्बल 8 बळी गेल्याने माजलगावमध्ये नागरिकात घबराट निर्माण झाली आहे. दरदिवशी 50 ते 60 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणार्‍या येथील शासकीय कोविड सेंटर व दोन हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले असून किमान 400 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातच रविवारी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पथक प्रमुख संतोष घाडगे यांनी दिली. येथील मंगलनाथ स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button