अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

लोखंडी सावरगांव येथील कोविड केअर सेंटरला मदत ; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी व आनंद गॅस सर्व्हिसेसचा पुढाकार

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
लोखंडी सावरगांव येथील कोविड केअर सेंटरला मदत करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी व आनंद गॅस सर्व्हिसेस यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.

अंबाजोगाई तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.या स्थितीत सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी कोविड केअर सेंटरला सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी नुकतेच केले होते.या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी व आनंद गॅस सर्व्हिसेस यांनी सोमवार,दिनांक १९ एप्रिल रोजी तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरला १२ हजार रूपयांची आर्थिक मदत केली.सदरील मदत निधी नायब तहसिलदार स्मिता सुभाष बाहेती यांनी स्विकारला.मागील वर्षीही संचालक ॲड.अनंतराव जगतकर यांनी आनंद गॅस सर्व्हिसेसचे माध्यमातून गरजू कुटुंबांना अडीच लक्ष रूपयांहून अधिकचे जीवनावश्यक किराणा साहित्य वाटप केले होते.मानवी संवेदना लक्षात घेवून ॲड.जगतकर यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे.यावेळेस केलेल्या मदतीतून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण पुन्हा एकदा समाजासमोर ठेवले आहे.यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनीचे अध्यक्ष अ‍ॅड.अनंतराव जगतकर,उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,सचिव प्रा.डी.जी.धाकडे,सदस्य डॉ.रविंद्र आचार्य आदीं उपस्थित होते.

प्रशासनाने घालून दिलेले 'ब्रेक-द-चेन' चे नियम पाळा

बीड जिल्ह्यासह अंबाजोगाईत कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झालेला आहे. कारण,दररोजच शेकडोंच्या पटीत कोरोना बाधितांची संख्या ही वाढत आहे. आरोग्य यंंत्रणेत काम करणारे डॉक्टर, कर्मचारी,नर्स हे आपले बंधू आणि भगिनी आहेत,अहोरात्र ही सर्व यंत्रणा आपल्या सर्वांसाठी जीवाची बाजी लावून काम करीत आहेत.तरी याची जाणिव ठेवून आपण कोरोना संसर्ग वाढणार नाही याबाबत सतर्कता बाळगा,आपण व आपले कुटूंबिय सुरक्षित कसे ठेवता येईल,घरातील वयोवृद्ध नागरिक, लहान मुले,मित्र व नातेवाईकांना कोरोना संसर्ग होणार नाही. याची काळजी कशी घेता येईल हे पाहणे आज महत्वाचे आहे. आपला स्वताःचा जीव धोक्यात घालून विनाकारण घराबाहेर फिरू नका,कोरोना पार्श्‍वभूमीवर नियमित मास्क व सॅनिटायझर वापरा,वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावेत,सुरक्षित अंतर ठेवावे,सार्वजनिक ठिकाणी खरेदी किंवा अन्य कामांसाठी गर्दी करू नये या नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो.खुपच महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा पडू नका, अंबाजोगाईत आरोग्य, महसूल विभाग, पोलिस बांधव व सर्व शासकीय यंत्रणा या संकटकाळात आपल्यासोबत उभे आहेत.कोणताही आजार अंगावर काढू नका,किरकोळ लक्षणे जाणवताच तात्काळ दवाखान्यात जावून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व योग्य औषधोपचार घ्यावेत,त्यामुळे अंबाजोगाईकर जनतेनं मागील वर्षीप्रमाणे यापुढील काळात ही कायद्याचा आदर व लॉकडाऊनचे पालन करावे,प्रशासनाने घालून दिलेले 'ब्रेक-द-चेन' चे नियम पाळा,बीड जिल्ह्यातील जनतेने प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे.

–ॲड.अनंतराव जगतकर (अध्यक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी,अंबाजोगाई.)