डॉ.बाबासाहेब ठोंबरे उत्कृष्ट प्राचार्य-२०२१ पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम येथील कृषि महाविद्यालय,अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना शिक्षण विकास संशोधन केंद्र दिल्ली यांच्या वतीने सोमवार,दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी व्हर्च्युअल ऑनलाईन माध्यमाद्वारे घेण्यात आलेल्या चौदावा राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्कार समारंभ आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट प्राचार्य-२०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य डॉ.ठोंबरे यांचे कृषि,पशुसंवर्धन,वृक्ष संवर्धन,विद्यार्थी, शेतकरी व पशुपालक यांच्या विकासाबाबत निस्पृह व निष्ठापूर्वक केलेले कार्य तसेच कार्यसंस्कृतीची प्रमाणिकपणे केलेली जोपासना या नेत्रदीपक,उत्तुंग अशा कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी "देशी गोवंश देवणी व लाल कंधारी" या जातीच्या संशोधन प्रकल्पांतर्गत व प्रजोत्पादन क्षेत्रातील गोपालकांच्या गोवंशाचा सर्वेक्षणाद्वारे महत्त्वपूर्ण अभ्यास व निरीक्षण करून त्यातील गुण-अवगुण याबाबत संशोधन केले आहे.डॉ.ठोंबरे यांनी देवणी गोवंशाचे विशेष गुणवर्णन,वैशिष्ट्ये, मुल्यांकन जतन व संरक्षण याबाबत मार्मिक प्रशिक्षक म्हणून केलेले कार्य मौलिक आहे.त्याच बरोबर संकरीत गोवंश,मराठवाडी म्हैस व उस्मानाबादी शेळी या पशुधनाची पैदास,आहार,व्यवस्थापन व विकास यामध्ये डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी भरीव योगदान दिले आहे.कृषि पदवी,पदविका व पशुवैद्यक पदवी तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे येथील प्राणीशास्त्र व तंत्रज्ञान या विषयांचे एकुण चौदा पुस्तकांचे लेखन केले आहे.शंभरहून अधिक संशोधनात्मक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत.कृषि पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या स्नातकांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.पशु पालकांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाबाबत जनजागृती करण्यासाठी शेतकरी व गुराखी मेळावे,आकाशवाणी व दूरदर्शन आदी माध्यमातून मार्गदर्शकाचे काम केलेले आहे.राष्ट्रीय पशु प्रदर्शनामध्ये परिक्षकाचे काम केलेले आहे.रक्तदान शिबीर आयोजन व रक्तदाता म्हणून काम केले आहे.त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन त्यांना यापुर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.डाॅ.बाबासाहेब ठोंबरे यांचे विधायक रचनात्मक आणि संशोधनात्मक कार्य ठळकपणे अधोरेखित झालेले आहे.त्यांच्या या उत्तुंग,प्रशंसनिय, नेत्रदीपक व कौशल्यपूर्ण कार्याचे योगदान लक्षात घेऊन महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग,पुणे येथील देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्र यात तांत्रिक सल्लागारपदीही त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.महाविद्यालयाचा परिसर हरित,स्वच्छ व सुगंधित तसेच प्लास्टिक मुक्त,कचरा मुक्त,तण विरहित व रमणीय असा विकसित केला असून या परिसरात 'अटल घनवन' या संकल्पनेवर आधारित विविध फळझाडे,फुलझाडे,औषधी वनस्पती यांची लागवड केलेली असून ठिकठिकाणी पक्षी थांबे बसवण्यात आलेले आहेत.त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर हिरव्या वनराईने नटला आहे.या माध्यमातून परिसरात ऑक्सीजन पार्क उभारला जात आहे.डॉ.ठोंबरे यांना शिक्षण विकास संशोधन केंद्र दिल्लीचा "उत्कृष्ट प्राचार्य-२०२१" या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण,संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता डॉ.धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ.रणजित पाटील,डॉ.दिगंबरराव चव्हाण,राहुल सोनवणे,पशुपालक, शेतकरी,विद्यार्थी व विविध स्तरांतील मान्यवरांकडून अभिनंदन व स्वागत होत आहे.


Previous post शिवसंग्राम तर्फे पाटोदा येथे कोरोना टेस्ट साठी येणाऱ्या नागरिकांना मास्क चे वाटप
Next post शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा उभारणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू