आग नियंत्रणात आणतांना चार कर्मचारी जखमी ,घोसला शिवारातील घटना

Last Updated by संपादक

घोसला,दि.२२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अजिंठ्याच्या डोंगराला लागलेला वणवा नियंत्रणात आणतांना वन विभागाच्या चार कर्मचाऱ्यांना अंधारात अंदाज न आल्याने हातांना भाजल्याने चार वन कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घोसला शिवारात घडली आहे.

घोसला शिवाराच्या पायथ्याशी असलेल्या बुधवारी दि.२० सायंकाळी अचानक वणवा पेटला होता या वणव्याची माहिती मिळताच बनोटी वन विभागाचे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहचले असता जोगेश्वरी व इंद्रगढी मंदिराच्या खाली अति तीव्र उतार व दुर्गम ठिकाणी आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच आर जी सपकाळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव, वनपरिमंडल अधिकारी बनोटी अनिल पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर आगीचे ठिकाण अतिशय तीव्र उतार, खोल कडा-कपारी व दुर्गम असल्यामुळे वन कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी पोहचणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत वनविभागाने १०-१२ जणांचे तीन पथक तयार केले व नियोजनपूर्वक सर्व बाजूने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.मात्र या रेस्कू पथकात आग नियंत्रणात आणतांना चार कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याने जखमी झाले तरीही या कर्मचाऱ्यांनी आगीचा चटका सहन करून आग नियंत्रणात आणली हि रेस्कू मोहीम तब्बल आठ तास सुरु होती. वन कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी उभे राहणे देखील अवघड होते तरीदेखील माघार न घेता वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनखली अखेर पहाटे 4 वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यास वनविभागाला यश आले. यावेळी ३ ते ४ कर्मचाऱ्यांना यावेळी किरकोळ दुखापत देखील झाली असल्याचे वनपाल अनिल पाटील यांनी सांगितले.

मागील साधारणतः 15 दिवसापूर्वीच गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात वनवनवा विझवत असताना 4 वनकर्मचारी जळून मृत्युमुखी पडले आहेत. सोयगाव वनविभागातील कर्मचारी अतिशय जोखीम घेऊन प्रत्येकवेळी तत्परतेने सूचना मिळताच जीवाची पर्वा न करता आग विझविण्याची कार्यवाही करतात व वनसंपदा व वन्यजीवांचे संरक्षण करतात. सदरील आग नियंत्रणात आणण्यासाठी वनरक्षक योगेश बोखारे,

सुदाम राठोड,महादेव शिंदे,सविता सोनवणे,सुनिल कुचे,रवींद्र गायकवाड आदींसह 35 ते 40 कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले

इंद्रगढीचा परिसर हा अतिशय तीव्र उतार व खोल कडा-कपारींचा असून दुर्गम आहे. त्याठिकाणी पोहचून आग विझवीणे अतिशय मोठे आव्हान व धोकादायक होते. तरीदेखील जीवाची पर्वा न करता नियोजनपूर्वक तीन पथके तयार करून आग नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध वन गुन्हा जारी करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने विशेष पथके तयार केली आहेत..

―राहुल सपकाळ ,वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव

आग विखुरलेल्या स्थितीत असल्यामुळे त्यावर नियंत्रण करणे अवघड होते. तरीदेखील माघार न घेता वन कर्मचाऱ्यांनी पूर्ण शर्थीने रात्रभर आग विझविली आहे त्यामुळे खूप मोठी वनसंपदा व वन्यजीवांची होणारी हानी रोखली आहे..

―अनिल पाटील ,वनपरिमंडळ अधिकारी, बनोटी