Last Updated by संपादक
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अंबाजोगाईतील मंगळवार पेठ येथील देवळा हनुमान मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “भगवान श्री रामचंद्र की जय” अशा जयघोषात प्रभू श्रीराम जन्मोत्सव हा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
देवळा हनुमान मंदिरात बुधवार,दिनांक २१ एप्रिल रोजी मंदिराचे पुजारी ह.भ.प.अनंत महाराज रांजवणकर यांच्या हस्ते विधिवत प्रतिमापूजन,साजशृंगार करण्यात आले.मंदिराच्या विश्वस्त कमलबाई सोमाणी यांनी आपल्या मधुर वाणीने अभंग,पाळणा व आरती गायन केले.मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पंचपदी घेऊन गुलाल व पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी राम जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना भाविक प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर म्हणाले की,चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे.या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे.हा दिवस सर्वञ श्री रामनवमी म्हणून साजरा करतात.त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.प्रभू रामचंद्र यांच्या विषयी देशातील भाविकांत अपार श्रध्दा आहे.श्रीरामनवमीच्या दिवशी मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन,रामकथेचे निवेदन,गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात.श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.परंतू,यावर्षी ही कोरोना संकटकाळामुळे राम जन्मोत्सव हा अतिशय साध्या पध्दतीने साजरा करावा लागला
असे प्रा.चौधरी म्हणाले.यावेळेस वसंतराव हावळे,धनंजय पोतदार हे भाविक भक्त उपस्थित होते.