पाटोदा तालुकाबीड जिल्हा

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यानी आत्मचिंतन करावे - अब्लुक घुगे

पाटोदा/बीड:नानासाहेब डिडुळ(उपसंपादक)
पाटोदा शहरात नगर पंचायतच्या गलथान कारभारामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे हे अगदी खरे आहे, पण ज्यांनी पाणी पुरवठा योजना खाऊन टाकल्या त्यांनीच आंदोलनाचा इशारा देणे म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली चकी हज को असा प्रकार असून, तुमच्या आंदोलनाला शुभेच्छा आणि जनतेसाठी काही तरी करायची बुद्धी दिली त्याबद्दल अभिनंदन, असे पत्रक सामाजिक कार्यकर्ते अबलुक घुगे यांनी काढले आहे.

पाटोदा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या असून, शहरात ठिकठिकाणी विविध नावाने पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र या योजना राबविण्यात पदाधिकारी आणि गुत्तेदार कार्यकर्त्यांनी या योजनेत बोगसपणा करून योजना फक्त नावापुरती राहिली. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. 2000 साली स्वजलधारा योजना शिवाजीनगर, माऊली नगर भागासाठी मंजूर करण्यात आली होती. ही योजना अर्धवट अवस्थेत काम करण्यात आल्यामुळे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. ही योजना चालू करण्यासाठी आम्हाला थेट हायकोर्टात याचिका दाखल करावी लागली. त्यानंतर कशी बशी योजना चालू झाली आहे. त्यासाठी पुन्हा वेगळ्या नावाने योजना मंजूर करून निधी वाढवून घेतला. तरीही
या योजनेत पाणी फिल्टर करण्याचे काम केले नाही म्हणून अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. ही योजना कुणी केली, कुणी भ्रष्टाचार केला हे सर्वानाच ठाऊक आहे.

अशाच प्रकारे शहरात विविध ठिकाणी वेग वेगळ्या नावाने पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. त्याची काय अव्स्था आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे.

त्यामुळे शहरात पाण्याची समस्या कुणाच्या कृपेने होत आहे हे सर्वानाच ठाऊक आहे त्या मुळे आज आंदोलनाची नौटंकी म्हणजे सौ चुहे खके बिल्ली चली हज को असा प्रकार आहे असे अब्लुक् घुगे यांनी पत्रकात म्हटले आहे.