पाटोदा : गोळीबारानंतर दोन्ही गटातील व्यक्तींविरोधात गुन्हा

Last Updated by संपादक

पाटोदा:नानासाहेब डिडुळ(उपसंपादक)— पैशाच्या देवणाघेवाणीवरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना पाटोदा शहरात बुधवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी २९ एप्रिल ला २५ जणांविरुद्ध गन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नळ योजनेतील कामाच्या पैशावरून कंत्राटदार विश्वनाथ हुले व माजी आमदार लक्ष्मण जाधव यांचे पुत्र संतोष जाधव यांच्यात अनेक दिवसापासून मतभेद होते. बुधवारी दुपारी संतोष जाधव हे नळ योजनेतील कामाच्या पैशासाठी हुले यांच्याकडे शहरातील शिवाजी चौकात असलेल्या त्यांच्या घरी गेले असता दोघांमध्ये वाद झाला. यावेळी संतोष जाधव यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह रात्री उशीरा हुले यांच्या घरी धाव घेतली. दरम्यान, आपल्याला धोका असल्याचे जाणवल्याने कंत्राटदार विश्वनाथ हुुले यांनी त्यांच्या पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले. या गोळीबारानंतर सर्वांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी हुले यांच्या घरी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी उपाधीक्षक विजय लगारे यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
याप्रकरणी २९ एप्रिलला पोलीस नाईक कातखडे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात विश्वनाथ हुले, संतोष जाधव, शरद बामदळे, सुधाकर गर्जे, गणेश खाडे, अमृत भोसले, मयूर जाधव, संदीप जाधव सह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आंधळे, पोलीस हवाललदार तांदळे, पो. हे. भोसले, सानप यांनी केली.
दरम्यान या घटनेनंतर कोणीच गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांनी सुमोटोअंतर्गत दोन्ही गटांतील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.