वैभव तांबारे या तरुणासाठी गावकऱ्यांनी जमा केला सव्वालाखाच्या आसपास कोरोनानिधी

वहाली गावाने घडवले माणुसकीचे दर्शन…!

बीड दि.०४:नानासाहेब डिडुळ―
पाटोदा तालुक्यातील वहाली गावचा तरुण वैभव चंद्रकांत तांबारे हा कोरोना संक्रमित झाल्याने साई हॉस्पिटल, जामखेड येथे भरती करण्यात आला होता. त्याचा कोअर पंधराच्या पुढे गेल्याने त्याला त्रास सुरू झाला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आणि महागड्या इंजेक्शन व औषधाची गरज लक्ष्यात घेता गावातील सर्व ग्रामस्थांनी आपापल्या परीने वैभवला मदत करण्याचे ठरवले. वहाली गावाच्या नावाने ग्रुप काढून ग्रुपच्या माध्यमातून कोरोनानिधी जमा करण्याचे आवाहन करताच मधुकर तांबरे, विष्णु घुमरे यांच्यासह सव्वालाखाच्या आसपास निधी जमा करून वहाली ग्रामस्थांनी घडवले माणुसकीचे दर्शन.
गावकरी ते राव काय करी, वहाली गावाने संकटात सापडलेल्या गावच्या सुपुत्राला कोरोनामुक्त करण्यासाठी आपापल्या परीने मदत करायला सुरुवात केली. यामध्ये ज्यांना आर्थिक मदत करता येईल त्यानें परिस्थितीनुसार आर्थिक मदतनिधी जमा करून सामाजिक बांधिलकी जपली. वहाली गावचा तरुण संकटात आहे आणि त्याला आर्थिक मदतीची गरज असल्याने गावकऱ्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न भविष्यात गावाच्या विकासासाठी, भरभराटीसाठी व वैभवासाठी, माणसातील मनभेद-मतभेद-जातीभेद विसरायला लावणारा असेल यात मात्र तिळमात्र शंका नाही. या घटनेची मौजे वहालीसह परिसरातील गावकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. वहाली गावातील ग्रामस्थ या घटनेतून बोध घेऊन सामाजिक बांधिलकी जपत प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मानवी संवेदना, दातृत्वाची एकजूट गावच्या वैभव व विकासासाठी करतील याची सुरुवात वैभवच्या कोरोना कारणीभूत असेल असेही गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. वैभव तांबारे यांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी सहृदय स्वागत केले. वैभव तांबारे याने पण वहाली गावच्या सर्व ग्रामस्थाचे मनःपूर्वक आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.