श्रीरामजन्मोत्सव समितीच्या वतीने कोरोना रूग्णांची सेवा,अन्नछञाद्वारे रूग्ण व नातेवाईकांना मिळतोय दिलासा

Last Updated by संपादक

अंबाजोगाई: मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी कोविड महामारीचे संकट अधिकच गडद होत आहे.संसर्ग व मृत्यूचे प्रमाण दररोजच वाढत आहे.या वर्षी कोवीडचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने एक महिन्याचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.यामध्ये कोवीड रूग्ण,नातेवाईक,सामान्य कष्टकरी लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे ही दुरापास्त झाले आहे.अशा परिस्थितीत श्रीराम जन्मोत्सव समिती ही आशेचा किरण ठरली आहे.समितीने सुरू केलेल्या अन्नछञाद्वारे रूग्ण,नातेवाईक व गरजूंना दिलासा मिळत आहे.

कोरोना संकटकाळात गरजू कोवीड रूग्ण,नातेवाईक व गरजू लोकांना अन्नछञाच्या माध्यमातून दर्जेदार जेवण पुरविण्याचे अनमोल कार्य श्रीरामजन्मोत्सव समितीच्या वतीने मागील पंधरा दिवसांपासून अव्याहतपणे सुरू करण्यात आले आहे.या माध्यमातून गरीब,गरजू लोक, रूग्ण व नातेवाईकांना दररोज पोळी,भाजी, पुलाव,लोणचे तर कधी गोड पदार्थ असे पौष्टिक व स्वादिष्ट जेवण देण्यात येत आहे.लॉकडाऊन मुळे आज अनेक गावे,खेडी व शहरे ही शांत आहेत.पण,रूग्णालये माञ रूग्णांनी मोठ्या प्रमाणावर भरलेली दिसून येत आहेत. अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण शासकीय वैद्यकीय रूग्णालय आणि लोखंडी सावरगावचे कोविड रूग्णालयात भरपूर संख्येने रूग्ण व त्यांचे नातेवाईक,गरजू लोक हे उपचारासाठी येत आहेत.या गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था श्रीराम जन्मोत्सव समिती, अंबाजोगाईच्या अमित जाजू,योगेश कडबाने, बाळा गायके,शुभम लखेरा,विजय रामावत,शुभम डिडवाणी,सतिश केंद्रे,शुभम चौधरी, सौरभ नारायणकर, नवनाथ अप्रूपपल्ले, योगेश म्हेञजकर, सिध्दू सातपुते, गजानन सुरवसे, बालाजी मारवाळ या तरूण कार्यकर्त्यांनी एकञ येत यावर्षी २३ एप्रिल रामनवमी पासून स्वता:चे पैशातून शासन निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करीत अन्नछञ सुरू करून मागील १५ दिवस अव्याहतपणे सुरू ठेवले आहे.समितीच्या तरूण कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न व तळमळ पहाता आता अनेक दानशूर व्यक्ती आपली नांवे जाहीर करू नका या अटीवर मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.हे विशेष होय,आता पुढील १५ दिवस समितीच्या सोबत ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई देखिल अन्नछञाचे माध्यमातून जेवण देण्याच्या या मोहीमेत सक्रिय सहभाग घेणार आहे अशी माहिती मिळत आहे.

अन्नछञाला सहकार्य करण्यासाठी दात्यांनी पुढे यावे
===================
कोरोना या महामारीचे
जगावर आलेले संकट लवकर दूर होईल,यासाठी प्रत्येकाने नियमीत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा,गर्दीत जाणे टाळावे,या ञिसुञीचे पालन करावे.दररोज किमान ५०० गरजू लोकांना अन्नदान करण्याचा आमचा संकल्प आहे.या कामात समाजातील जे दानशूर व्यक्ती,संस्था आणि संघटना ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीचे अमित जाजू यांनी केले आहे.