अजिंठ्याच्या डोंगरात वणवा…चौदा तासांनी नियंत्रणात ,वनविभागाची अख्खी रात्र जंगलात

जरंडी,ता.०६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्याच्या हद्दीला लागुनच असलेल्या घोसला,निमखेडी शिवाराला असलेल्या अजिंठ्या डोंगराला बुधवारी सायंकाळी अचानक लागलेला आगीचा वणवा पेटल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाच्या पथकांनी अक्खी रात्र डोंगरात घालविली व वणवा नियंत्रणात आणला चौदा तासांच्या अथक परिश्रमाने हा वणवा नियंत्रणात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी दिली आहे.या वणव्याच्या नियंत्रणात चार ते पाच वनकर्मचारी भाजल्याची घटना उघडकीस आली आहे.उपचारासाठी या कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोयगावच्या घोसला आणि निमखेडी हद्दीला लागूंचा असलेल्या अजिंठ्याच्या डोंगराच्या कळसुदेवी जोगेश्वरी व इंद्रगढी मंदिराच्या खाली अतितीव्र उतार व दुर्गम ठिकाणी आग लागली होती.या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने सोयगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली व अख्खी रात्र डोक्यावर घेवून वणवा विझविण्याचे कामा हाती घेतले होते. सदर आगीचे ठिकाण अतिशय तीव्र उतार, खोल कडा-कपारी व दुर्गम असल्यामुळे वन कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी पोहचणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत वनविभागाने चार पथक तयार केले व नियोजनपूर्वक सर्व बाजूने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. वन कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी उभे राहणे देखील अवघड होते तरीदेखील माघार न घेता वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनखली अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यास वनविभागाला यश आले. यावेळी तीन ते चार कर्मचाऱ्यांना या आगीत भाजले आहे. सोयगाव वनविभागाच्या पथकांनी रात्रीच जीवाची पर्वा न करता घटनास्थळ गाठले व मोहीम सुरु केली होती.वन्य जीवांच्या संरक्षणासाठी वनविभाग तत्पर झाला होता.आगीच्या वणव्याने वन्य प्राण्यांची धावपळ झाली होती.

१)कळसुदेवीचा परिसर हा अतिशय तीव्र उतार व खोल कडा-कपारींचा असून दुर्गम आहे. त्याठिकाणी पोहचून आग विझवीणे अतिशय मोठे आव्हान व धोकादायक होते. तरीदेखील जीवाची पर्वा न करता नियोजनपूर्वक तीन पथके तयार करून आग नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध वन गुन्हा जारी करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने विशेष पथके तयार केली आहेत ―राहुल सपकाळ ,वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव

२)आग विखुरलेल्या स्थितीत असल्यामुळे त्यावर नियंत्रण करणे अवघड होते. तरीदेखील माघार न घेता वन कर्मचाऱ्यांनी पूर्ण शर्थीने रात्रभर आग विझविली आहे त्यामुळे खूप मोठी वनसंपदा व वन्यजीवांची होणारी हानी रोखली आहे.

―अनिल पाटील, वनपरिमंडळ अधिकारी, बनोटी

दरम्यान आग नियंत्रणात आणण्यासाठी सिल्लोड वनविभागाचे वनपाल अमोल रावूत,नितेश मुल्ताने,कृष्णा पाटील,योगेश बोखारे,सुदाम राठोड,महादेव शिंदे,सविता सोनवणे,दशरथ चौधरी,झामू पवार,आदींनी युद्ध पातळीवर मोहीम राबविली.