अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येत्या १४ मे २०२१ रोजी सामाजिक समानतेचे पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर यांची जयंती असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने खबरदारी म्हणून सार्वजनिक कार्यक्रम आयोजनावर बंदी घातली आहे.त्यामुळे प्रत्येक वीरशैव लिंगायत समाज बांधवाने महात्मा बसवेश्वर यांची जयंती आपल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरी करावी तसेच जयंतीनिमित्त कोविड रूग्णालयास वैद्यकीय सेवेसाठी मदत व सहकार्य करावे असे आवाहन बसव ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी केले आहे.
आज संपूर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे.या विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांचे आदेशानुसार राज्यासह बीड जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे.या काळात सर्व सामाजिक कार्यक्रम, सणोत्सव,जयंती उत्सव कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.त्यामुळे यंदा १४ मे २०२१ रोजी साजरी होणारी महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या स्वरूपात साजरी केल्या जाणार नाही.तरी मराठवाड्यातील समस्त वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी १४ मे रोजी स्वतःच्या घरीच जयंती साजरी करावी तसेच शक्य असल्यास गरजू कुटूंबिय यांना होईल तेवढी जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी.महात्मा बसवेश्वर यांच्या उदारमतवादी विचारांचे,मानवतावादी शिकवणुकीचे पालन करून देशहितासाठी,समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण जंयतीदिनी घरातच थांबून त्यांना अभिवादन करू आणि कोरोना विरूद्धच्या लढाईत एकजूट दाखवू असे आवाहन करून पोखरकर यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हे नम्र आवाहन करण्यात येत आसल्याचे म्हटले आहे.
कोविड रूग्णालयास मदत करा :
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय रूग्णालय व लोखंडी सावरगांव येथील कोविड रूग्णालयास मदत करावी.याप्रमाणेच मराठवाड्यातील समाज बांधवांनी ही आपापल्या भागातील कोविड रूग्णालयास वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक असलेले साहित्यसामुग्री भेट स्वरूपात देवून मदत व सहकार्य करावे.
-विनोद पोखरकर (विभागीय अध्यक्ष,बसव ब्रिगेड)