जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वचिंतक गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन

Last Updated by संपादक

अंबाजोगाई (वार्ताहर):
स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वचिंतक गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुरेंद्रनाना खेडगीकर, ज्येष्ठ अभियंता प्रकाश सरवदे,प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर,महसूल अधिकारी महेश राडीकर हे उपस्थित होते.सर्वप्रथम प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले की,गुरूदेव रवींद्रनाथ टागोर हे एक जागतिक किर्तीचे साहित्यिक होते.तसेच ते एक थोर कवी,कादंबरीकार,कथाकार,नाटककार,चित्रकार,विचारवंत,निबंधकार,कलावंत,संगीततज्ज्ञ,तत्त्वचिंतक,शिक्षकतज्ञ व देशभक्त होते.त्यांनी शांतिनिकेतनच्या माध्यमातून रवींद्र संगीताची स्थापना केली व आपले विचार मासिकाच्या द्वारे जनतेपर्यंत पोहोचविले,रवींद्रनाथ ठाकूर ज्यांना गुरूदेव असे ही संबोधले जाते,१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी त्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला.रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते.बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला.संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.रवींद्रनाथांच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंब-या,निबंध,लघुकथा,प्रवासवर्णने,नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली.यमकप्रचुरता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते.रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात.सामान्य माणसांचे जीवन हे त्यांच्या कथांचे बीज आहे नव्या पिढीने त्याचा अभ्यास करावा असे प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर यांनी नमुद केले.कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देश पाळून अभिवादन करण्यात आले.