मराठा आरक्षण प्रकरणी सोशल मीडीयावर अपशब्द वापरणाऱ्या दादासाहेब मुंडेंची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी –काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई (वार्ताहर): सोशल मीडीयावर मराठा आरक्षणाबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त लिखाण करणा-या दादासाहेब मुंडे यांच्या पक्ष विरोधी कार्यपद्धतीची नोंद घेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी बुधवार,दिनांक १२ मे रोजी दिले आहेत.अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.

सोशल मीडीयावर मराठा आरक्षणाबाबत अपशब्द वापरून लिखाण करणा-या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य दादासाहेब मुंडे (वडवणी,जि.बीड) यांच्या काँग्रेस पक्ष विरोधी कार्यपद्धतीची नोंद घेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तात्काळ कारवाई केली.मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर लागलीच मराठा समाज व आरक्षणाबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त लिखाण करून तमाम मराठा समाजाच्या भावना दुखावल्या होत्या,मराठा आरक्षण प्रकरणी महाविकास आघाडी सरकाने मोठे प्रयत्न करून ही सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारले ही बाब माहित असताना ही दादासाहेब मुंडे यांनी सोशल मीडीयावर अपशब्द वापरले हे खेदजनक व निषेधार्ह आहे.मुंडेंच्या कृतीमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबाबत जनमानसांत वेगळा संदेश गेला.या प्रकरणी भावना दुखावल्या गेल्याने अनेक मराठा सेवकांनी व मराठा संघटनांनी दादासाहेब मुंडे यांना तात्काळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदावरून हटविण्याची मागणी केली होती.या अनुषंगाने मुंडे यांना पदावरून हटविण्याच्या अनेकांनी केलेल्या मागणीच्या काही वर्तमानपत्रातून बातम्या ही प्रकाशित झाल्या होत्या.या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी बुधवार,दिनांक १२ मे २०२१ रोजी दादासाहेब मुंडे (प्रभारी हिंगोली जिल्हा) यांना निलंबित केल्याचे जाहीर केले.या आदेशपञात म्हटले आहे की,काँग्रेस पक्षाची भूमिका विचारात न घेता,आपण आपली वैयक्तिक मते जनतेसमोर मांडत आहात.यामुळे काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.त्याचप्रमाणे आपल्याविरोधात स्थानिक पातळीवरून अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत.आपली ही कृती अतिशय गंभीर स्वरूपाची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे.काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाविरूध्द आपले कृत्य असल्यामुळे मा.प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून आपणांस पुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबीत करण्यात येत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष माणिक जगताप यांनी आपणांस दिलेल्या पञाद्वारे कळविले असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.