महाराजा महाराणा प्रताप व कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

अंबाजोगाई (वार्ताहर):
स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथुजी गुरूजी प्रतिष्ठानच्या वतीने महाराजा महाराणा प्रताप यांची जयंती व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुरेंद्रनाना खेडगीकर,ज्येष्ठ अभियंते प्रकाश सरवदे,प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर,महसूल अधिकारी महेश राडीकर,डॉ.दिलीप खेडगीकर,श्रीधर काळेगावकर हे उपस्थित होते.सर्वप्रथम प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक व आयोजन प्रा.राम चौधरी धर्मापुरीकर यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले की,मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह सिसोदिया हे महान योध्दे होते,मातृभूमीच्या रक्षणार्थ त्यांनी स्वता:च्या प्राणाचे बलिदान दिले,महाराणा हे अद्भुत सामर्थ्य व स्वाभिमानाचे प्रतिक होते.तर कर्मवीर भाऊराव पाटील हे थोर समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.त्यांचा
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सक्रिय सहभाग होता.रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.त्यांचे व्यक्तिमत्व हे जातीभेदाच्या पलीकडे होते.महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते.बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रूजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतीगृहात विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत,यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समतेचा संदेश दिला असे प्रतिपादन प्रा.राम चौधरी धर्मापूरीकर यांनी केले.कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देश पाळून अभिवादन करण्यात आले.