अंबाजोगाई (वार्ताहर):
सामाजिक क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देणारे समाजसेवक व कोरोना योद्धे यांना यावर्षीचा “महात्मा बसवेश्वर सेवा सन्मान” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येवून जयंती वरील अनावश्यक खर्च टाळून स्वा.रा.ती.शासकीय वैद्यकीय रूग्णालयांस अत्यावश्यक साहित्य सामाजिक बांधिलकीतून देण्यात आले असल्याची माहिती जगतज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली आहे.
अंबाजोगाईत दरवर्षीच उत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यावर्षी शुक्रवार,दिनांक १४ मे रोजी अंबाजोगाई शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.समितीच्या वतीने रूग्णसेवेसाठी अत्यावश्यक असणारे साहित्य स्वा.रा.ती.शासकीय वैद्यकीय रूग्णालयांस भेट म्हणून देण्यात आले.येथील महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्य करणा-यांना व कोरोना योध्दयांना “महात्मा बसवेश्वर सेवा सन्मान पुरस्कार-२०२१” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप ग्रंथ,शाल व पुष्पगुच्छ असे होते.त्यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता.अपर जिल्हा पोलिस अधिक्षक स्वाती भोर,अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे,समाजसेवक अनिकेत लोहिया,समाजसेवक
प्रसाददादा चिक्षे,कोरोना योद्धे डॉ.विनय नाळपे,डॉ.विशाल लेडे,अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे,कोरोना योद्धा डॉ.नागेश सर,डॉ.इरा ढमढेरे,सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार,कोरोना योद्धे मल्हारी जोगदंड,बाळासाहेब गायके (श्रीराम जन्मोत्सव समिती,
अंबाजोगाई.) या पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या घरी जाऊन कोविड नियमांचे पालन करीत त्यांना सन्मानित करण्यात आल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी सांगितले.समितीच्या वतीने रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या कमोड खुर्च्या, सॅनिटायझर फवारणी यंत्र,रूग्णांना चालण्याचे वॉकर अशा वस्तू अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे यांच्याकडे सोपविण्यात आल्या.याप्रसंगी स्वा.रा.ती.रूग्णालयाचे कोविड विभागप्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार,प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,उपमुख्याध्यापक एस.के.निर्मळे,रवि मठपती,गणेश काळे, प्रसाद कोठाळे, तोडकरी,शैलेश स्वामी,दिपक मंगे, संतोष काळे,योगेश पोखरकर,वैभव पोखरकर,गौरव लामतुरे,संजय साळवे,गणेश रूद्राक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.आज संपुर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे.या विषाणूचा प्रसार होऊ नाही,यासाठी महाराष्ट्राचे सन्माननिय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे आदेशानुसार राज्यासह बीड जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे.या काळात सर्व सामाजिक कार्यक्रम, सणोत्सव,जयंती उत्सव कार्यक्रमावर बंदी घातली आहे.त्यामुळे यंदा मे रोजी साजरी होणारी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केल्या जाणार नाही.तरी अंबाजोगाई तालुक्यात समस्त वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी १४ मे रोजी स्वतःच्या घरीच जयंती साजरी करावी तसेच शक्य असल्यास गरिबांना होईल तेवढी जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी असे आवाहन करण्यात आले होते.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व महात्मा बसवेश्वर बचतगट यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
जयंती उत्सवातून समाजसेवा :-
महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन,ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यापूर्वी रक्तदान शिबिर,गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त स्पर्धा व त्यांचे सत्कार,समाजातील व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार,पाण्याचे हौद व गुरांना चारा वाटप,भजन स्पर्धा आदींचे आयोजन केले आहे.तसेच २५१ सदस्य असलेल्या मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या महात्मा बसवेश्वर बचतगटाच्या माध्यमातून युवा उद्योजक व सुशिक्षित तरूणांना वेळोवेळी कर्ज वाटप केले जाते.यावर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली.त्यानिमित्त कोविड रूग्णांना उपयोगी पडतील अशा कमोड चेअर,व्हील चेअर,स्ट्रेचर,सॅनिटायझर मशिन,ऑक्सीजन स्प्रे इत्यादी वस्तू स्वा.रा.ती.रूग्णालयास भेट म्हणून देण्यात आल्या.जयंतीनिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाय,डॉ.अनिल मस्के,मयत कोविड रूग्णांवर अंत्यसंस्कार करणारे रणधीर सोनवणे यांचाही सन्मान करण्यात आला.जयंती उत्सवातून बांधिलकी जोपासत समाजसेवा करण्याचा विधायक प्रयत्न केला जात आहे.तो पुढेही कायम राहील.
-विनोद पोखरकर (अध्यक्ष,महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती.)