बीड जिल्हा काँग्रेस कमेटीची श्रध्दांजली
===================
अंबाजोगाई (वार्ताहर):
काँग्रेसचे युवा नेते व खासदार राजीवजी सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशाने एक अभ्यासू,कार्यकुशल आणि आश्वासक नेतृत्व गमावले आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी,कार्यकर्त्यांशी जवळकीचे,मित्रत्वाचे,सौहार्दाचे संबंध होते.ते भारतीय राजकारणाचा एक सुसंस्कृत चेहरा होते अशा शब्दांत राजकिशोर मोदी यांनी दिवंगत खा.सातव यांच्या आठवणी जागवल्या व शोकभावना व्यक्त केल्या.सोमवारी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काँग्रेस पक्षाचे युवा खा.राजीवजी सातव यांचे निधन झाल्यामुळे सोमवार,दिनांक १७ मे रोजी सहकार भवन हॉल येथे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून शोक व्यक्त करण्यात आला.प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण केली.याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की,खा.राजीवजी सातव यांचे अकाली निधन हे वेदनादायक आहे.एक युवा नेता,अभ्यासू आणि कृषी विधेयकावेळी संसदेत आक्रमक पवित्रा घेत शेतकरी बांधवांना समर्थन देणारं संवेदनशील नेतृत्व काळाने हिरावून नेले.सातव कुटुंबियांच्या दुःखात बीड जिल्हा काँग्रेस कमेटी व आम्ही सर्वजण सहभागी आहोत.सातव हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते होते,नेहमी हसतमुख राहून सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे अशी त्यांची ख्याती होती.राजीवजी सातव यांच्या निधनाने देशाने सामाजिक प्रश्नांची जाण असणारे एक उदयोन्मुख नेतृत्व गमावले आहे.सातव हे काँग्रेसच्या यंग ब्रिगेड मधील धुरंधर नेते म्हणून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध होते.सातव हे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या “कोअर टीम” मध्ये होते.गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू साथीदार होते.राहुलजी यांनी त्यांच्यावर गुजरात आणि पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली तेंव्हा त्यांनी ती जबाबदारी यशस्विपणे पार पाडली.त्यांनी पक्षाला गुजरात राज्यात चांगले यश मिळवून दिले.तर पंजाब मध्ये काँग्रेसला सत्ता मिळवून दिली.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते हिंगोली मतदारसंघातून चांगल्या मतांनी निवडून आले होते.भारतीय संसदेतील त्यांच्या लक्षवेधी व अभ्यासपूर्ण कामगिरीमुळे त्यांना तब्बल चार वेळा “संसदरत्न” या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.खासदार होण्याआधी ते आमदार होते.२००९ साली ते कळमनुरी मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते.पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि खासदार होणा-या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.राजीवजी यांनी त्यांच्या आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदेत स्वतःचा वेगळा ठसा उमटविला.संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणा-या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्वाचे नेते मानले जात.ते संसदेत भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत असले तरी भाजपसह सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे,सौहार्दाचे संबंध होते.राजीवजी हे संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य ही होते.तिथेही त्यांनी आपल्या कार्याने वेगळी छाप सोडली.युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद असो की,गुजरात किंवा पंजाब विधानसभेच्या निवडणुका पक्षाचा झेंडा फडवकावणे असो काँग्रेस पक्षाने दिलेल्या विविध जबाबदा-या त्यांनी लीलया पार पाडल्या.राजीवजी सातव यांच्या निधनाने फक्त काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे ही मोठे नुकसान झाले आहे.अशा या दिवंगत युवा नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली,त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना या शब्दांत राजकिशोर मोदी यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.या प्रसंगी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक मनोज लखेरा,सुनिल व्यवहारे,राणा चव्हाण,भारत जोगदंड,दिनेश घोडके,जावेद गवळी,अमोल मिसाळ,सचिन जाधव हे उपस्थित होते.