आपेगाव कोविड केअर सेंटरमध्ये योगाचे धडे
===================
अंबाजोगाई (वार्ताहर):
तालुक्यातील आपेगाव येथे कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असणा-या रूग्णांवर योग्य औषधोपचार करण्यात येत आहेत.कोरोना रोगात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत.नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरासह सकारात्मक मानसिकता वाढीस लागते त्याअनुषंगाने जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या पुढाकार व संकल्पनेतून आपेगाव येथील कोविड केअर सेंटर मधील रूग्णांना योगाभ्यासाचे धडे देण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग,बीड., इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया) संस्था,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था, अंबाजोगाई.,ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जयकिसान महाविद्यालय,आपेगाव या ठिकाणी जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून आपेगाव येथे उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित व सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर या ठिकाणी मोफत औषधोपचार करून रूग्णांना दररोज योगाचे धडे दिले जात आहेत.याबाबत माहिती देताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की,अंबाजोगाईच्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांची दररोज वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरजू रूग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची उपचारासाठी होणारी परवड थांबावी याच विधायक उद्देशाने आपेगाव येथे स्ञी व पुरूष रूग्णांसाठी उपचाराची स्वतंत्र व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.येथे मेडिकल स्टाफ,आवश्यक औषधे,सुविधा उपलब्ध आहेत.येथील रूग्णांच्या सेवेसाठी निष्णात डॉक्टरांचा फौजफाटा नेमण्यात आला आहे.त्यासोबत मोठ्या प्रमाणात कर्मचारी व स्वयंसेवक उपलब्ध आहेत.कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करणे आवश्यक आहे.त्यामुळे हसत-खेळत व आनंदी वातावरणात बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.सध्या कोरोना या रोगात योगाचे उपचार महत्त्वाचे ठरत आहेत.नियमित योग व व्यायाम करण्याने सुदृढ शरीरासह सकारात्मक मानसिकता वाढीस लागते.त्याअनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अजय ठोंबरे,डॉ.धनेश्वर मेनकुदळे,डॉ.व्यंकट बेंबडे,डॉ.फड,डॉ.भारत नागरे,डॉ.गायञी ढमाले,परीचारीका कावरे,ढाकणे,कराड,देशमुख,मुंडे,जगदाळे,शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत,बालाजी वाघमारे,रवी सरवदे,अजित बनसोडे आदींच्या सहकार्यातून या कोविड केअर सेंटर मधील रूग्णांना योगाभ्यासाचे धडे देण्यात येत आहेत.एकिकडे कोरोनाच्या धास्तीने अनेक दिग्गज हे घरात बसून असताना दुसरीकडे माञ जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख माकेगावकर हे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आणि विलगीकरण केलेल्या व्यक्तींना योगाचे धडे देऊन व्याधिमुक्त करीत आहेत.याकामी त्यांना निलेशराव शिंदे,जयजीतबापू शिंदे,प्रविण देशमुख,राजाभाऊ देशमुख,बाळासाहेब जगताप,आश्रुबा करडे,बळीराजे वाघमारे,बालासाहेब तट,पिंटू शिंदे,शेख अस्लम यांचे सहकार्य लाभत आहे.मागील काही दिवसांत आपेगाव कोविड केअर सेंटर मध्ये दाखल रूग्णांना योगाचे महत्व पटवून दिले आहे.रूग्णांसाठी राजेसाहेब देशमुख हे सकाळीच ६ वाजता कोविड केअर सेंटरला पोहचतात.सर्व पॉझिटिव्ह रूग्णांना इमारत परीसरातील मोकळ्या मैदानात फिजिकल डिस्टन्सींग ठेवून एकञ करतात.देशमुख हे योगाविषयी सूचना देतात.रोगप्रतिकारक क्षमता वाढावी आणि श्वसनसंस्था मजबूत होऊन शरीरात अधिकाअधिक प्राणवायूचा संचार व्हावा यासाठी राजेसाहेब देशमुख हे स्वता: योगाभ्यास करत रूग्णांकडून सहज,सोपा असा विविध प्रकारचा योगा करवून घेतात.त्यात ओंकार,दीर्घ श्वसन,अनुलोम विलोम,भ्रमर,कपालभाती,भसरीका या योग प्रकारांचा यात समावेश असतो.सर्वांना योगाचे महत्त्व पटवून देत दररोज योगा करावा असे आवाहन या माध्यमातून करण्यात येते.रूग्ण लवकर बरे व्हावेत व त्यांची कोरोना विरोधात प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योग अभ्यासक इंगळे सर यांच्याकडून दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत योगासने प्राणायाम यांचे धडे दिले जात आहेत.यावेळी शासनाच्या नियमांचे योग्य पालन केले जात आहे.
*कराल योग तर रहाल निरोग :-*
==================
कोविड-१९ रोगासाठी आज तरी कोणतेही रामबाण औषध उपलब्ध नसल्याने व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती हीच महत्त्वाची ठरत आहे.शीर्षासन, सर्वांगासन,हलासन, पादहस्तासन,अर्धवक्रासन,धनुरासन,पवनमुक्तासन आदी आसने उपयुक्त ठरत आहेत.सूर्यभेदन व नाडीशोधन हे प्राणायामाचे प्रकार देखील प्रतिकारशक्ती वाढीला मदत करत असल्याचे दिसून येत आहे.सकाळी प्राणायाम व योगासने आणि राञी गीत-संगीताची सुरेल मेजवानी,सोबतच कवि संमेलन यांचे आयोजन करण्यात येत आहे.योग्य निदान,तात्काळ औषधोपचार,पौष्टिक आहार,आयुर्वेदिक काढा देवून सर्व सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत.कोविड केअर सेंटर परीसरात प्रवेश करताच रूग्ण आपली व्याधी विसरून जातो.आपेगाव येथील कोविड केअर सेंटर मधून दर्जेदार रूग्णसेवेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर म्हणून आपेगाव नांवारूपास येत आहे याचे समाधान वाटते असे जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.