कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाखांचे सानुग्रह अनुदान

मयत शिक्षकांच्या वारसदारांनी सानुग्रह अनुदानासाठी तात्काळ प्रस्ताव दाखल करावेत-शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांचे आवाहन

==================
अंबाजोगाई (वार्ताहर):
कोविड-१९ मुळे जे शिक्षक,कर्मचारी मयत झालेले असतील त्यांचे वारसदारांनी सानुग्रह अनुदान मिळणेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा असा आदेश शिक्षण अधिकारी जि.प.बीड यांनी शुक्रवार,दिनांक २१ मे २०२१ रोजी पारीत केला आहे.त्यामुळे सदरील आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून कोविडमुळे मयत शिक्षकांच्या कुटूंबियांना ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करून मृत शिक्षकांच्या कुटूंबियांना मदत व लाभ मिळवून द्यावा अशी मागणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार (अंबाजोगाई) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी राज्यासह बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य यंत्रणांच्या मदतीला शिक्षकांची नियुक्ती केली आहे.परंतू,कर्तव्य बजावत असताना मागील एक वर्षापासून आजतागायत बीड जिल्ह्यात अनेक शिक्षक बांधव मृत्यूमुखी पडले आहेत.मात्र,त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान न मिळाल्याने त्यांची परवड होत आहे.यामुळे या काळात कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून तात्काळ मान्यता द्यावी आणि या कुटुंबीयांना ५० लाख रूपये सानुग्रह अनुदान मिळण्याची कार्यवाही तात्काळ करून दिलासा द्यावा अशी मागणी ही शिक्षक नेते विजयदादा रापतवार यांनी केली आहे.कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका करण्यासाठी विविध सरकारी विभागातील कर्मचार्‍यांंच्या सहकार्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली आहे.पहिल्या लॉकडाउनपासून आत्तापर्यंत अनेक शिक्षक या सेवेत कार्यरत आहेत.हे काम करत असताना मृत्यूमुखी पडणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.यामध्ये कोणत्याही विभागातील कर्मचार्‍यांचा थेट उल्लेख नाही.वर्षभराच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या कुटुंबियांना याचा लाभ मिळावा अशी मागणी शिक्षक नेते रापतवार यांनी केली आहे.याच बरोबर या काळात आजारी पडलेल्या किंवा कोरोना बाधित झालेल्या शिक्षकांचे वैद्यकीय खर्चाचे प्रस्तावही काही तांत्रिक बाबी उपस्थित करून प्रलंबित ठेवल्याचे दिसत आहेत.अशा संकटकाळात असे होवू नये.

*मयत शिक्षकांच्या कुटुंबाची परवड थांबवा*
==================
कोरोना बाधितांची सेवा करत असताना व आपले कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना वार्‍यावर सोडू नका,या कुटुंबांची परवड थांबवा.शासन व प्रशासनाने याप्रश्नी संवेदना व माणुसकी दाखवावी.मयत शिक्षकांच्या कुटुंबियांना तात्काळ ५० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात यावी आणि मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना अनुकंपा अंतर्गत नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी ही शिक्षक मैञी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.