कोरोनाला घाबरू नका,योग्य औषधोपचार घेतल्यास रूग्ण ठणठणीत बरा होतो-जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख

आपेगाव कोविड केअर सेंटरमध्ये झाला कोरोनामुक्त रूग्णांचा सत्कार

अंबाजोगाई (वार्ताहर):
वेळेवर निदान,योग्य औषधोपचार,आहार घेतल्यानंतर कोरोनावर मात करता येते हे पुन्हा एकदा दिसून आले.कोरोना काळात कुटूंबातील सदस्य म्हणून काळजी घेतल्याने तालुक्यातील आपेगाव येथे मंगळवार,दिनांक २५ मे रोजी ६ जण कोरोनामुक्त झाले.त्यांचा सत्कार जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.आपेगाव येथे रूग्णांना ठणठणीत बरे करून कोरोनामुक्त केले जात आहे.हे संकटकाळात एक आशादायी चिञ दिसून येत आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग,बीड.,इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया) संस्था,अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था,अंबाजोगाई.,ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जयकिसान महाविद्यालय,आपेगाव या ठिकाणी जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून आपेगाव येथे उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित व सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर मोफत औषधोपचार करून रूग्णांना दररोज योगाचे धडे, योग्य औषधोपचार, पौष्टिक आहार, आयुर्वेदिक काढा दिला जात आहे.याचा फायदा असा झाला की,बाधित रूग्ण हे लवकर कोरोनामुक्त होत आहेत.अशाच ६ जणांचा मंगळवार रोजी कोविड केअर सेंटर मधून शाल व गुलाबपुष्प देवून राजेसाहेब देशमुख,पञकार अभिजीत गाठाळ,निलेशराव शिंदे व इतरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.तसेच यावेळेस प्रतिकार क्षमता वाढविणारी औषधे देवून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली.याप्रसंगी कोरोनामुक्त झालेल्या काही रूग्णांनी आपले सकारात्मक अनुभव कथन केले,तर काहींनी लेखीही नोंदवले आहेत.आपेगाव कोविड केअर सेंटर मधून दर्जेदार आरोग्य सेवा,सुविधा मिळत असल्याचे सांगुन पुनर्जन्म मिळाल्याची माहिती दिली.एका कुटुंबासारखी काळजी घेतली.हसत खेळत व आनंदी वातावरणात उपचार करण्यात आले.हे कोविड सेंटर एक हॅप्पी होम असल्याची प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.यावेळी माहिती देताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की,ग्रामीण भागात कोरोना बाधित व गरजू रूग्णांची उपचारासाठी होणारी ससेहोलपट थांबावी व त्यांना तत्पर,दर्जेदार आरोग्य सेवा,सुविधा व सोय उपलब्ध व्हावी याच विधायक उद्देशाने आपेगाव येथे स्ञी व पुरूष रूग्णांसाठी उपचाराची स्वतंत्र व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करणे आवश्यक आहे.त्यामुळे हसत-खेळत व आनंदी वातावरणात बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.याचा फायदा असा झाला की, मागील दहा दिवसांतच ६ हून अधिक जण हे कोरोना मुक्त झाले.आज त्यांना या सेंटर मधून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात येत आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.भारत नागरे, डॉ.अजय ठोंबरे, डॉ.धनेश्वर मेनकुदळे, डॉ.व्यंकट बेंबडे, डॉ.फड,डॉ.गायञी ढमाले,परीचारीका कावरे,ढाकणे,कराड,देशमुख,मुंडे,जगदाळे,शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत, बालाजी वाघमारे,रवी सरवदे,अजित बनसोडे आदींच्या सहकार्यातून या कोविड केअर सेंटर मधील रूग्णांवर अतिशय उत्तम रितीने औषधोपचार करून योगाभ्यासाचे धडे, पौष्टिक आहार, आयुर्वेदिक काढा, हळदीचे दुध,औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीचे अर्कयुक्त औषधी देण्यात येत आहेत.एकिकडे कोरोनाच्या धास्तीने अनेक दिग्गज हे घरात बसून असताना दुसरीकडे माञ जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांच्या सारखे संवेदनशील नेते माञ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आणि विलगीकरण केलेल्या व्यक्तींना योगाचे धडे देऊन व्याधिमुक्त करीत आहेत.याकामी त्यांना निलेशराव शिंदे, जयजीतबापू शिंदे, प्रविण देशमुख, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब जगताप, आश्रुबा करडे, बळीराजे वाघमारे, बालासाहेब तट,पिंटू शिंदे,भास्कर पाटील, शेख अस्लम यांचे सहकार्य लाभत आहे. मागील काही दिवसांत आपेगाव कोविड केअर सेंटर मध्ये दाखल रूग्ण ठणठणीत बरे व कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे ही कौतुकास्पद व दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

*योग्य औषधोपचाराने करता येते कोरोनावर मात :-*
==================
आज कोरोनावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नसले तरी व्यक्तीची रोग
प्रतिकारशक्ती हीच महत्त्वाची ठरत आहे.योगासने,हलका व्यायाम हे उपयुक्त आहेत.कोरोनाचे योग्य निदान,तात्काळ औषधोपचार,पौष्टिक आहार,आयुर्वेदिक काढा देवून सर्व सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत.आपेगाव येथील कोविड केअर सेंटर मधून दर्जेदार रूग्णसेवेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर म्हणून आपेगाव नांवारूपास येत आहे.कोविड केअर सेंटर परीसरात प्रवेश करताच रूग्ण आपली व्याधी विसरून जात आहेत.यामुळेच रूग्ण ठणठणीत बरे व कोरोनामुक्त होताना पाहून आपण मनुष्य जीवनात कुणाच्या तरी मदतीला आलो आहोत याचा मनापासुन आनंद होत असल्याचे जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.