लोकनेते विलासराव देशमुख यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अभिवादन

बुद्ध जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा-राजकिशोर मोदी
==================
अंबाजोगाई (वार्ताहर): राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री व केंद्रिय अवजड उद्योगमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना बुधवार,दिनांक २६ मे २०२१ रोजी अभिवादन करून बुद्ध जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील सर्व जनतेस मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सहकार भवन हॉल प्रशांतनगर येथे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (बुद्ध पौर्णिमा,वैशाख पौर्णिमा) बुध्द मूर्तीस वंदन करून सर्वांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.त्यानंतर लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यानिमित्ताने तथागत गौतम बुद्ध यांना वंदन करताना राजकिशोर मोदी म्हणाले की,तथागत गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ,महान लोकशिक्षक व समाज सुधारक होते.त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली.जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.जगभरातील अनेक मानवतावादी आणि विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे.गौतम बुद्धांचे सर्व तत्वज्ञान हे ‘पाली’ भाषेमध्ये आहे.’पंचशील’ हे बौद्ध धर्माचे सार आहे.भारत हे राष्ट्र बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला.बौद्ध धर्मातील अहिंसा,सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी जगावर प्रभाव टाकला आहे.बुद्ध धम्म हा वैचारिक स्वातंत्र्य प्रदान करतो.सद्गुणांचा विकास,समता तत्त्वाचा प्रभाव,वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास,नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव,करूणा (दयाबुद्धी),प्रामाणिकपणा,प्रेम,परोपकार,अहिंसा, क्षमाशिलता,शीलसंवर्धन,यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला आहे.बौद्ध धर्माचे कलेतील आणि स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान मोठे आहे,शिक्षणास प्रोत्साहन देवून भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार करून बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे.जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (बुद्ध पौर्णिमा,वैशाख पौर्णिमा) सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!असे मोदी म्हणाले.यावेळी अंबाजोगाई शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष महादेव आदमाने यांनी प्रास्ताविक केले.तर उपस्थितांचे आभार सुनिल व्यवहारे यांनी मानले.यावेळी नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक वाजेद खतीब,धम्मपाल सरवदे,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,भारत जोगदंड,दिनेश घोडके,अकबर पठाण,सुशिल जोशी,प्रताप देवकर,अजीम जरगर,सचिन जाधव,अमोल मिसाळ यांच्या सहीत एन.एस.यु.आय,युवक काँग्रेस,सेवादल आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.

*सामान्य माणूस केंद्रबिंदू समजून लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे कार्य*
=================
लोकनेते देशमुख यांच्या काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली.दळण-वळणाची साधने निर्माण झाली.उद्योग,व्यवसाय यांची वाढ झाली.सहकारी क्षेत्राला बळ मिळाले,विशेषतः बीड जिल्ह्यासाठी भरिव निधी प्राप्त झाला.मराठवाडा वैधानिक विकास महामंडळामार्फत जिल्ह्याला अनेक प्रकल्प व योजना मंजुर झाल्या.लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी सामान्य माणूस केंद्रबिंदु समजून अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले.त्यांच्या कार्याचे स्मरण कायम राहिल त्यांचे कार्य,विचार यातनू प्रेरणा घेवून पुढील काळात काँग्रेस पक्ष मजबुतीने उभा राहिल,तरूण कार्यकर्त्यांनी लोकनेत्याचा आदर्श घेवून समाजाभिमुख कार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी केले.