पंडीत जवाहरलाल नेहरू व माता रमाई आंबेडकर यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अभिवादन

अंबाजोगाई (वार्ताहर):
भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू व त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवार,दिनांक २७ मे २०२१ रोजी अभिवादन करण्यात आले.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सहकार भवन हॉल,प्रशांतनगर येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या निमित्ताने त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना राजकिशोर मोदी म्हणाले की,महामानव बाबासाहेबांच्या सहचारिणी,त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा आज स्मृतीदिन आहे.आयुष्यात अत्यंत खडतर असा जीवनप्रवास करताना बाबासाहेबांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माता रमाईंचा त्याग आपण कधीही विसरू शकणार नाही.मातोश्री रमाई म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली होत्या.महामानव डॉ.बाबासाहेबांच्या कठीण काळात पत्नी रमाईंनी त्यांना खंबीर साथ दिल्यानेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवनोत्थानासाठी कार्य करू शकले.स्त्री ही जशी गृहिणी तशी सुसंस्कारीत समाज निर्माण करणारी माताही आहे.युगपुरूष महामानव डॉ.बाबासाहेबांच्या आयुष्यात समर्थ साथ दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाखातर रमाई लिहिण्या-वाचण्यास शिकल्या.त्यानंतर बाबासाहेबांच्या सोबतीने त्यासुद्धा समाजजागृतीसाठी महिलांच्या सभांचे आयोजन करीत असत.त्यांच्यासमोर भाषणे देऊन वंचितांच्या चळवळीत सहभाग नोंदविण्यासाठी त्यांना प्रेरीत करीत असत.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेण्यासाठी दूरदेशी असताना माता रमाई आंबेडकरांनी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करीत संसार सांभाळला.अशा पददलितांच्या आई त्यागमूर्ती रमाईंचा आज ‎२७ मे हा स्मृतिदिन यानिमित्त त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करतो असे राजकिशोर मोदी म्हणाले.यावेळी नगरसेवक वाजेद खतीब,सुनिल व्यवहारे,धम्मपाल सरवदे,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर,दिनेश घोडके,जावेद गवळी,अजीम जरगर यांच्या सहीत एन.एस.यु.आय,युवक काँग्रेस,सेवादल आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.

*आधुनिक भारताचे शिल्पकार पंडीत जवाहरलाल नेहरू*
=================
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता संघर्ष करणा-या प्रमुख महापुरूषांमध्ये जवाहरलाल नेहरू हे एक होते.पंडित जवाहरलाल नेहरू हे एक आदर्शवादी आणि सिध्दांतिक प्रतिमेचे महानायक होते.भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू एक असे राजनेता होते ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर पाडला आहे.इतकेच नाही तर ते एक समाजवादी,धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक गणतंत्राचे गणितज्ञ देखील मानले जातात.पंडीत नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार देखील म्हटल्या जाते.“देशाच्या सेवेत नागरिकत्व आहे.” या विचाराच्या बळावरच त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा बहुमान प्राप्त झाला.ते आदर्शवादी आणि महान स्वातंत्र्यसेनानी होते,त्यांनी पारतंत्र्यातील भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता महात्मा गांधीना समर्थ साथ दिली होती.ते एक कुशल समाजकारणी,आदर्शवादी,विचारक आणि महान लेखक होते,आधुनिक भारताचा पाया रचणारे देशाचे थोर नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

– राजकिशोर मोदी (जिल्हाध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)