अंबाजोगाईतील व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्या -जिल्हाधिका-यांना अंबाजोगाईतील व्यापा-यांचे निवेदन

अंबाजोगाई (वार्ताहर):
अंबाजोगाईतील अत्यावश्यक सेवेसह इतर व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी विनंती अंबाजोगाईतील व्यापा-यांनी जिल्हाधिकारी,बीड यांना मंगळवार,दिनांक १ जून रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत अंबाजोगाईतील व्यापारी बांधवांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,मागील अनेक महिन्यांपासून अंबाजोगाई येथील अत्यावश्यक सेवा व इतर व्यवसायिकांची दुकाने ही बंदच आहेत.कोविड १९ मुळे आपण घेतलेले निर्णय हे योग्य व आवश्यक आहेत.परंतू,कोरोना प्रार्दुभावाची पुर्वीची स्थिती व सद्यस्थितीमध्ये बराच फरक पडलेला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांची दुकाने बंद असल्यामुळे खूपच विपरीत परिणाम होत आहेत.या व्यावसायिकांवर व्यवसाय बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.परिणामी त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे.तसेच मोठ-मोठ्या व्यवसायिकांना बँकेची कर्जफेड,दुकानाचे भाडे,लेबर पेमेंट,वीज बील भरणा यासारख्या अनेक समस्या आहेत.त्यासाठी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना आपणांस योग्य वाटेल त्या वेळेचे बंधन टाकून व्यवसाय चालविण्यास परवानगी देणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे.जर व्यवसाय चालविण्यास परवानगी नाही दिली तर व्यावसायिकांना आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही व विदारक परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.आम्हा व्यवसायिकांना व्यवसाय चालविण्यास परवानगी दिल्यानंतर आम्ही आपण दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास तयार आहोत.त्या बाबत कसली ही तक्रार येऊ देणार नाहीत.तरी जिल्हाधिकारी साहेबांनी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना देखिल वेळेच्या बंधनानुसार व्यवसाय चालविण्यास परवानगी द्यावी अशी विनंती प्रतिष्ठित व्यापारी शामसुंदर सत्यनारायण बजाज,अकबर पठाण आणि अधिकार मर्लेचा आदींसह व्यापारी बांधवांनी केली आहे.सदरील निवेदनावर अंबाजोगाई शहरातील अनेक व्यापारी बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत.