तुळशीचे रोप देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा , लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेचा स्तुत्य उपक्रम

अंबाजोगाई (वार्ताहर): तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेने विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीकांना कृष्ण तुळशीचे रोप व गांडूळखत देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.हा स्तुत्य उपक्रम राबवून गोशाळेचे संचालक ॲड.अशोक मुंडे यांनी पर्यावरण संवर्धन व वृक्ष संगोपनाचा मौलिक संदेश दिला.

अंबाजोगाई पासून जवळच असलेल्या वरवटी येथे ॲड.अशोक मुंडे यांची गोशाळा आहे.या गोशाळेत सध्या ७२ पेक्षा जास्त गोवंशाचे संगोपन केले जाते.लोकसहभागातून मोठ्या मुश्किलीने ही गोशाळा चालते.गोशाळेतील गायींचे संगोपन करण्यासाठी ॲड.अशोक मुंडे हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.पशु प्राण्यांवरही प्रेम करून त्यांना लळा लावून माणुसकी जोपासतात.मागे काही महिन्यांपूर्वी त्यांनी संगोपन केलेल्या वासराचे गायीत रूपांतर झाल्यानंतर डोहाळ जेवण दिले होते. त्यावेळी त्याची चर्चा संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यात चर्चिली गेली होती.५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वञ साजरा करण्यात येतो.पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीपर काम करणारे ॲड.अशोक मुंडे यांनी यावर्षी जवळपास १०० कुटुंबांना कृष्ण तुळशीचे रोप व गांडूळ खत देवून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला व शुभेच्छा दिल्या. गोशाळेचे प्रमुख ॲड.अशोक मुंडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की,वरवटी येथील गोशाळेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मागील ४ वर्षांपासून गोशाळेच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जनजागृती करीत आहोत.सध्या गोशाळेत ७२ देशी गोवंशाचे संवर्धन करण्यात येत आहे. आज कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये आपले कुटूंब निरोगी रहावे,घरातील वातावरण शुद्ध रहावे,निरोगी अन्न खाता यावे म्हणून गोशाळेच्या वतीने कृष्ण तुळस व गांडूळ खताचे वाटप करण्यात आले व यापुढेही करण्यात येणार असल्याचे संचालक ॲड.अशोक मुंडे यांनी सांगितले. पुढे माहिती देताना ते म्हणाले की,पर्यावरण दिन का साजरा करायचा तर “आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो.या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थिती मध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय-स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.” पर्यावरण संवर्धनाकरीता जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी तातडीने पावलं उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे.जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक थीम ठरवली जाते आणि एक देश त्यासाठी ‘होस्ट’ अथवा यजमान असतो.२०२१ वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणे हे होय. वर्षांनुवर्षे आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करीत आहोत,आणि त्यामुळेच परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय.जगभरामध्ये आज दर तीन सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढं जंगल नष्ट होतंय हे भयंकर आहे.जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी ५० टक्के प्रवाळ नष्ट झाली असून २०५० पर्यंत ९० टक्के प्रवाळं नष्ट होण्याचा अंदाज आहे.पर्यावरणाची ही हानी रोखत,पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न,ही यावर्षीची थीम आहे.२०२१ पासून पुढचं दशक युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्रं) परिसंस्थेचं पुनरूज्जीवन करण्यासाठीचं दशक म्हणून साजरं करणार आहे.पर्यावरणाची हानी टळली,संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानव जातीला ही होईल, गरीबी कमी होईल, हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत,असं युनायटेड नेशन्सने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने म्हटलंय.त्यामुळे आपण सर्वजण मिळून यावर्षी एक तरी वृक्षरोप,झाड लावायचा व त्याचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा विधायक प्रयत्न करूयात असे आवाहन ॲड.अशोक मुंडे यांनी केले आहे. वरवटी येथील गोशाळेचा खर्च हा नैसर्गिक रंग व गो-आधारित उत्पादन निर्मिती आणि विक्रीतून करण्यात येतो.हिंदू धर्मातील विविध सण उत्सव साजरे करताना पर्यावरणपुरक व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी गोशाळा अव्याहतपणे कार्य करते.गोशाळेच्या वतीने गोमूत्र अर्क, तुलसी अर्क, पारिजातक अर्क,दन्त मंजन,धुपबत्ती, अमृतधारा,फेसपॅक,पंचगव्य साबण, भांड्याची साबण, भांड्याची पावडर, शॅम्पू,सॅनिटायझर,पंचगव्य घृत, कर्णद्रव्य, गोमय चिप, अग्निहोत्र गवरी, गणेशमूर्ती, स्मृतिचिन्ह,गोमय पणती, कामधेनू काढा, आयुर्वेदिक चहा, वेदनाशामक (पेन रिलीफ) बाम, गोखुर खत, गांडूळ खत, जीवामृत आणि घनजीवामृत मागणी प्रमाणे,समाधी खत, गोमय भस्म,गोनाईल ही सर्व गो-आधारित उत्पादने तयार केली जातात. जर कुणाला नैसर्गिक पध्दतीने तयार केलेली ही गो-आधारित उत्पादने हवी असतील तर त्यांनी गोशाळेचे प्रमुख ॲड.अशोक मुंडे,लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळा, वरवटी,ता.अंबाजोगाई,जि.बीड.(मोबाईल क्रमांक : 9764185272 / 8329552898.) येथे संपर्क साधावा.