अंबाजोगाई (वार्ताहर):
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शनिवार,दिनांक ५ जून २०२१ रोजी महाविद्यालय परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५० वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.यात कडुनिंब,पिंपळ,गुलमोहर अशी विविध सावली आणि ऑक्सिजन देणारी निसर्ग पोषक झाडांची रोपे याप्रसंगी लावण्यात आली.यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.धर्मराज तांदूळजेकर,अंतर्गत गुणवत्ता हमी विभागप्रमुख डॉ.मुकुंद राजपंखे,भूगोल विभागातील प्रा.दिलीप कांबळे,संरक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा.शैलेश जाधव,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.इंद्रजीत भगत आदींसह इतरांची उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ.धर्मराज तांदूळजेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले,एका बाजूला मोफत ऑक्सीजन देणाऱ्या वृक्षवल्लीचे महत्व किती मौलील आहे याची शिकवण देणाऱ्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या
॥ वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ॥ वनचरे पक्षीही सुस्वरो आळवीती ॥ येणे सुखे रूपे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत ॥१॥ या शिकवीणीचा विसर ही मानवाला झालेला.परोपकार करणाऱ्या वृक्षाच्या मुळावर घाव घालून मानवाने स्वतःचे अस्तित्व आज धोक्यात आणलेले आहे.जल,जंगल,भुमी मानवाये मानवाचे भरण पोषण करण्याचे काम करत असते परंतू,भौतिक सुखाच्या मागे धावत असताना निसर्गाची आणि नैसर्गिक साधन संपत्तीची मानवाने असनात लूट केलेली आहे,ती कुठेतरी थांबली पाहीजे असे ते म्हणाले.तर भावी पिढीला जगण्याचा आधार देणारे काम आज आपण करीत आहोत असे म्हणत याप्रसंगी त्यांनी सर्वांचे कौतुक केले.तर सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे यांनी याप्रसंगी पर्यावरणावर नेमके भाष्य करणा-या आपल्या गजलेतील चार ओळी सादर केल्या त्या अशा “अंकुर पोसा आमचा नारा,कोवळ्या चोचींसाठी चारा,चैतन्याचे तोरण येवो,तुमच्या दारा आमुच्या दारा.” कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शैलेश जाधव यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.इंद्रजीत भगत यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.दिलीप कांबळे यांनी मानले.
*भावी पिढ्यांसाठी वृक्ष संगोपन करा-प्रभारी प्राचार्य डॉ.धर्मराज तांदूळजेकर :-*
हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे.त्याचा देखील विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहे.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळीच पावले उचलली गेली नाही तर भविष्यात मानवाला ऑक्सिजन सिलेंडर कायमस्वरूपी सोबत घेऊन फिरण्याची वेळ येऊ शकते.यासाठी ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचे संगोपन करतो त्याप्रमाणे या वृक्षांचे देखील संगोपन करावे अशी मौलिक सूचना प्रभारी प्राचार्य डॉ.धर्मराज तांदूळजेकर यांनी यावेळी केली.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत प्रभारी प्राचार्य डॉ.धर्मराज तांदूळजेकर यांच्या संकल्पनेतून महाविद्यालय परीसरात ५० वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली असे सांगून ते पुढे म्हणाले की,फुकटात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे महत्व किती मौलिक आहे हे आजवर मनुष्याने कधीच गांभीर्याने घेतले नाही.मात्र जीवावर बेतणाऱ्या कोरोना संकटात पैसे देवून देखील ऑक्सिजनची नितांत गरज असणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांना कृत्रिम ऑक्सिजन वेळेवर मिळत नव्हता.त्यावेळी आपल्याला वृक्षांचे महत्व समजले.वृक्ष लावा,वृक्ष जगवा अशी चळवळ अनेक सामाजिक संस्था मागील अनेक वर्षापासून राबवत आहेत.मात्र निसर्गाचा बिघडलेला समतोल सावरला जावून,वृक्ष लागवडीला चालना मिळावी यासाठी ही मानवासाठी अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ.तांदुळजेकर यांनी केले.