खते व बियाणे उपलब्ध साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावल्यास अन्नदात्यांची आर्थिक लूट थांबेल― सुरेश पाटोळे

Last Updated by संपादक

बीड:नानासाहेब डिडुळ―
देशासह राज्यातील शेतकरी कोरोना महामारीच्या संकटात असतानाच बीड जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राविषयी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकाने नियमानुसार दुकानाच्या दर्शनी भागात खते व बी-बियाणांचा किंमतीसह उपलब्ध साठा असलेला फलक लावावा आणि अन्नदात्या शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी तसेच कृषी विभागाने कृषी केंद्रांची तपासणी करून दोषी असणाऱ्या केंद्रावर कार्यवाही करण्याची मागणी मानवी हक्क अभियान चे जिल्हा सरचिटणीस तथा शिव संघर्ष ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी केली आहे.
कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मालाच्या साठ्यांचा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक असतांनाही कोणत्याही ठिकाणी फलक दिसून येत नाही. याशिवाय अधिकृत परवाना प्राप्त असल्याचा फलक, जीएसटी नोंद फलक, खते बियाणे बॅगचे वजन मोजण्यासाठी वजन काटा अनेक दुकानात आढळून येत नाही. त्यामुळे अनेक अन्नदात्या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना पाहिजे ते खते बी-बियाणे उपलब्ध साठा असतांनाही नको असलेल्या एखाद्या कंपनीच्या खताची व बियाणांची विक्री करण्यासाठी आग्रह दुकानदारांकडून धरला जातो. त्यामुळे कृषी विभागाने शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या करून दोषी केंद्र चालकांचा परवाना रद्द करावा,

याशिवाय कृषी सेवा केंद्रात विक्री रजिस्टर, खते, बी-बियाणे, औषधे दुकानदाराने खरेदी केली तिची नोंद रजिस्टर, तसेच दिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटी नोंद रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे. या शिवाय कोणतेही खत, बियाणे व इतर साहित्य घेतल्यास त्याची पावती देणे दुकानदाराला बंधनकारक करावे. कृषी विभागाने सर्व कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या करून, जे कृषी सेवा केंद्र दोषी आढळलेले आहेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाई करण्यात यावी. त्यांनी सुधारणा न केल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले आहे.