अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अभिवादन

अंबाजोगाई (वार्ताहर): संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार,दिनांक १८ जुलै रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदींकडून अभिवादन करण्यात आले.

अंबाजोगाई येथील सहकार भवन हॉल मध्ये रविवारी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदींकडून संत शिरोमणी नामदेव महाराज आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.प्रारंभी प्रतिमापूजन व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रबोधनपर कार्याचे स्मरण करताना जिल्हाध्यक्ष मोदी म्हणाले की,संत शिरोमणी नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते.ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते.त्यांनी “व्रज” भाषांमध्येही काव्ये रचली.शिख बांधवांच्या “गुरू ग्रंथ साहिबा” तले चरित्रकार,आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.त्यामुळे पंजाबी बांधवांनी आज त्यांच्या जन्मस्थान “नरसी नामदेव” या गावाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला.प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले.पंजाब मधील शीख बांधवांना ते आपलेच वाटतात.’संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.संत नामदेवांनी कीर्तने करीत संपूर्ण भारतभर प्रवास केला असे सांगून जिल्हाध्यक्ष मोदी यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचे ही यावेळी स्मरण करताना सांगितले की,अण्णा भाऊ साठे हे एक लोकशाहीर,समाजसुधारक,लोककवी आणि लेखक होते.त्यांचे लेखन हे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरले आहे.अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो.आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रूजविण्याचे महत्त्वपूर्ण काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,शाहीर अमर शेख,शाहीर साबळे आणि शाहीर द.न.गव्हाणकर यांनी केले.मुंबई,मराठवाडा,विदर्भ,कोकण,पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.त्यांच्यामुळे लोक प्रेरित झाले.मराठी भाषेत साठे यांनी नाटके,लोकनाट्य,रशियातील भ्रमंती हे प्रवासवर्णन,कथासंग्रह,कादंब-या,शाहिरीवर पुस्तक आणि मराठी पोवाडा शैलीतील गाण्यांसह त्यांची विपुल अशी साहित्यकृती आज ही उपलब्ध आहे.मुंबई मधील शहरी जीवनाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,राणा चव्हाण,सुनिल वाघाळकर,अकबर पठाण,शरद काळे,अजीम जरगर,शाकेर काझी आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button