सुरेश धस व अन्य 29 जणांवर गुन्हा दाखल

आष्टी:अशोक गर्जे―स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध निवडणुकीत उभे असल्याचा राग मनात धरून आमदार सुरेश धस आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्या हॉटेलची जेसीबीने तोडफोड केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसात आमदार सुरेश धस व त्यांच्या २९ समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मनोज चौधरी असं तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

राजकीय वादातून संपत्तीचे नुकसान

2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली होती. या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलच्या विरोधात पांढरी येथील माधुरी चौधरी ह्या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. याचाच राग मनात धरून सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पती मनोज चौधरी यांच्यावर खोट्या तक्रारी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

सुरेश धस व अन्य २९ जण अशा तब्बल ३० जणांवर गुन्हा दाखल

अनेक वेळा तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करत नसल्याचे सदर महिलेने थेट गृहमंत्री यांना पत्र लिहिले होते. 19 जुलैच्या रात्री सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पांढरी येथे पोहचले आणि पीडित महिलेच्या संपत्तीची तोडफोड केली अशी तक्रार महिलेने केली आहे. त्यानुसार आष्टी पोलिसात आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या अन्य २९ समर्थकांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ

सुरेश धस यांच्यावर आधीही राजकीय दहशतीतून गुन्हा केल्याची नोंद आहे. एका गुन्ह्यातून मुक्त होत नाहीत तोपर्यंतच आता दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाल्याने सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Previous post ब्रम्हगाव-मुगगाव-सावरगावघाट निकृष्ट रस्त्याप्रकरणात पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठेकेदार-प्रशासकीय आधिकाऱ्यांवर कारवाईसाठी भगवानबाबांच्या स्मारक स्थळी आंदोलन ― डॉ.गणेश ढवळे
Next post पावसाने उघडीप देताच कपाशीवर मावा,तुडतुड्यांचा प्रादुर्भाव ,१५ हजार ५३३ हेक्टर क्षत्र बाधित