जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेतर्फे २२ वा कारगिल विजय दिवस साजरा

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील जय जवान आजी माजी सैनिक संस्थेतर्फे सोमवार,दिनांक २६ जुलै रोजी २२ वा कारगिल विजय दिवस शहिदांना अभिवादन करून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग रघुनाथराव शेप व संपूर्ण संचालक मंडळ आणि संस्थेतील अंदाजे दोनशेहून अधिक सभासद,महिला भगिनी,युवक उपस्थित होते.प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप व कॅ.सय्यद खाजा नजिमोद्दीन या दोघांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.कारगील युद्धातील शहीद जवानांना अभिवादन केले.याप्रसंगी जय जवान आजी माजी सैनिक संस्था परिसरांमध्ये अभिवादन सभा घेण्यात आली.सभेचे सूत्रसंचालन महादेव कांदे यांनी केले.या सभेच्या सुरूवातीला संस्थेचे सचिव कॅ.अभिमन्यू शिंदे यांनी सभेपुढे कारगिल युद्धाचा इतिहास कथन केला.यानंतर कारगिल युद्धात ज्यांचा सक्रिय सहभाग होता असे संस्थेचे ज्येष्ठ संचालक कॅ.शेख उस्मान यांनी कारगिल युद्धातील स्वतःच्या अनेक आठवणी सांगून जे जवान कॅ.उस्मान यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर युद्धामध्ये शहीद झाले.त्या शहीद जवानांच्या शौर्याचे त्यांनी भावपूर्ण शब्दांत वर्णन केले.शहीद जवानांच्या कुटुंबावर जे दुःख व संकट आले.त्या संकटांवर मात करण्याची ताकद जगाच्या निर्मात्याने त्यांना द्यावी असे भावनिक विचार त्यांनी व्यक्त केले.शेवटी सभेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारगिल युद्धातील शहीद जवानांविषयी दुःख व्यक्त केले.व कारगील युद्धाचा संपूर्ण इतिहास सभेसमोर ठेवला.कॅप्टन शेप म्हणाले की,जे शहीद झाले त्या जवानांच्या अंत्यविधी पर्यंतच शासकीय अधिकारी दुःख व्यक्त करतात पण,नंतर माञ त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना शासनस्तरावर कोणीही विचारत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत,सहकार्य केले जात नाही.त्यामुळे आता इथून पुढे आपण सर्व सैनिक परिवारांनी एकञ येऊन,याप्रश्नी लक्ष देऊन प्रयत्नशील राहूयात.जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रश्नांची सोडवणूक करून सैनिक कुटुंबाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करावे लागेल असे कॅ.पांडुरंग शेप यांनी सांगितले.त्यानंतर सभेची सांगता झाली.