सोयगाव दि.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्याच्या दुष्काळाची दाहकता गंभीर होत असतांना दुष्काळाच्या झळा आता शेतकऱ्यांच्या पाठोपाठ मजुरांना व जनावरांनाही बसू लागल्या असून हातांना कामे व पिण्यासाठी पाणीच नसल्याने सोयगाव तालुक्यातून मजुरांचे दुसऱ्या टप्प्यात स्थलांतर वाढले आहे.लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या मजुरांना राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हुडकून आणले,परंतु निवडणुकानंतर मजूर व त्यांची जनावरे पिण्याच्या पाण्याने व कामेच उपलब्ध नसल्याने कासावीस होवून पुन्हा स्थलांतरित होण्यासाठी मार्गस्थ झाले आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पासून सुरुवात झालेली दुष्काळाची चाहूल मात्र अंतिम टप्प्यात गंभीर झाली आहे.टंचाईवर उपाय योजना करण्यासाठी प्रशासनासमोर शासकीय निकष डावलून दुष्काळ नियंत्रित करता येत नसल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी तुटपुंजी मदत देवून शेतकयांच्या तोंडाला पाने पुसली आहे.दरम्यान खरिपाच्या पिकविम्यातही कंपन्यांनी शासकीय निकषानुसार पीकविमा प्रतवारी लावल्याने ऐन दुष्काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्यापोटी तुटपुंजी रक्कम हातात मिळाली आहे,दरम्यान पिकांच्या नुकसानीपोटी मिळालेली रक्कम आणि झालेल्या नुकसानीची तुलना करता लागवडीचा खर्चही या मदतीतून मिळालेला नाही,त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कचाट्यातून बाहेर काढल्याचा डंका वाजविणाऱ्या प्रशासनाकडून मात्र ऐन गंभीर दुष्काळात मजुरांच्या हातांना कामे उपलब्ध करून देण्यास यश आलेले नाही.त्यामुळे दुष्काळाची दाहकता गंभीर झाली आहे.