आठवडा विशेष टीम―
मुंबईत २५ जून रोजी होणार पुढील बैठक
नागपूर, दि. 5 : विधानभवन विस्तारीकरण करताना पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक नियोजनावर आपला भर आहे. यादृष्टीने विधानभवन विस्तारीकरणासंदर्भात येत्या २५ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज येथे दिले.
विधानभवन नागपूर येथील विस्तारांतर्गत इमारतीचे बांधकाम व जमिनीच्या अधीग्रहणासंदर्भातील आढावा त्यांच्या अध्यक्षतेखाली येथील विधानभवनात घेण्यात आला. या आढावा बैठकीला महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.
विधिमंडळाची हेरिटेज इमारत कायम ठेवून हेरिटेज वास्तूव्यतिरिक्त उपलब्ध जागेच्या प्रस्तावित बांधकामाची माहिती सादर करण्यात यावी. विधिमंडळ परिसरात प्रस्तावित बांधकाम करताना पुरेशा प्रमाणात झाडे लावून पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात यावा. रस्ते मोठे व प्रशस्त असावेत. मुंबईतील पावसाळी अधिवेशनापूर्वी २५ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी यावेळी दिले.
राजस्थान विधिमंडळात संग्रहालय उभारण्यात आले आहेत. याच धर्तीवर नागपूर विधिमंडळ परिसरात संग्रहालय उभारण्यात येऊ शकते का याची पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचबरोबर एफएसआय, पुरातत्व विभागाच्या परवानग्या यांचीही माहिती सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठकीत दिले.
विधिमंडळ परिसराची केली पाहणी
बैठकीनंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधिमंडळाची दोन्ही सभागृहे, मंत्रिदालनांसह विधिमंडळ परिसराची पाहणी करीत आवश्यक सूचना संबंधितांना दिल्या.