Offer

नांगर खांद्यावर घेऊन शेतकरी सहदेव होनाळे यांची विधानभवनाकडे पायी दिंडी; लिंबागणेशकरांचा पाठिंबा

लिंबागणेश, दि. ०७ जुलै (प्रतिनिधी): गेल्या आठवड्यात डोक्यावर कर्जाचा बोजा आणि कोळपणीसाठी पैसे नसल्याने हडोळती येथील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांच्यावर स्वतःच्या खांद्यावर जोखड घेऊन शेती कसण्याची वेळ ओढवली होती. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आणि विविध दैनिकांत फोटोसह बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. यानंतर सरकारने त्यांना ४० हजार रुपयांची मदत देऊन दखल घेतली. मात्र, सरकार जर खांद्यावर नांगर घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच दखल घेत असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने खांद्यावर जोखड घेऊनच शेती करायची का? असा सवाल उपस्थित करत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेतकरी सहदेव होनाळे यांनी ४ जुलै, शुक्रवारपासून खांद्यावर नांगर घेऊन मुंबईच्या विधानभवनाकडे पायी दिंडी काढली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी पदवीधर शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन

सहदेव होनाळे हे ६ जुलै, रविवार रोजी लिंबागणेश येथे मुक्कामी होते. आज सकाळी, सोमवार रोजी लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी त्यांना यश मिळो, अशा शुभेच्छा देत ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी डॉ. गणेश ढवळे, राम फाळके, हरिओम क्षीरसागर, सुनील ढवळे, समीर शेख, लहू घोलप, चेतन कानिटकर, नवनाथ बोराडे, अर्जुन घोलप आणि खंडू वाणी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

सहदेव होनाळे हे पदवीधर असून, त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी, भाऊ आणि मुलांसह एकूण १३ सदस्य आहेत. तीन भावंडांमध्ये मिळून एकूण साडे नऊ एकर शेती असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तीव्र नाराजी

डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना सहदेव होनाळे यांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “सरकारकडून कर्जमाफी दिली जात नाही. आधारभूत किंमत योजनेसाठी नोंदणी करूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जात नाही. मनरेगा अंतर्गत कामाचे पैसे मिळत नाहीत आणि एक रुपयात पीक विमा योजना सरकारने गुंडाळली आहे.” मागील दोन-तीन वर्षांतील पीक विमा अजूनही मिळालेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवत असून, सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहे,” अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.

शेतकऱ्यांच्या या व्यथांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सहदेव होनाळे यांचा हा संघर्ष सुरूच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button