संत वामनभाऊ महाराजांचे विचार समाजासाठी दीपस्तंभ; गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड, १० (विशेष प्रतिनिधी): समाजाला अध्यात्म, सदाचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवणारे नाथ परंपरेतील महान संत वामनभाऊ महाराज यांचे विचार काळाच्या ओघातही अत्यंत सुसंगत आणि प्रेरक ठरत आहेत. त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश पिढ्यान्पिढ्या समाजाला मार्गदर्शन करत राहतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी आणि कळशारोपण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या भव्य सोहळ्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, गडाचे महंत विठ्ठल महाराज, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, विक्रमानंद शास्त्री आणि स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर गडाचा सेवक म्हणून उपस्थित
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना अत्यंत नम्रपणे व्यक्त केल्या. ते म्हणाले की, संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. हे निमंत्रण मुख्यमंत्र्याला नसून, संत वामनभाऊ महाराजांच्या एका भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला महंत विठ्ठल महाराजांनी दिले आहे, या भावनेतून मी येथे उपस्थित आहे. नाथ परंपरेतील महान संत आणि शंकराचा अवतार मानले जाणारे संत वामनभाऊ महाराज हे समाजाला दिशा देणारे सद्गुरू होते.
वामनभाऊंची शिकवण आणि समाज परिवर्तन
संत वामनभाऊ महाराजांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यावर प्रकाश टाकला. महाराजांनी दऱ्या-खोऱ्यांतून प्रवास करत भागवत पंथाचा प्रचार केला आणि समाजात एकोप्याचा संदेश दिला. मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होते, हा विचार त्यांनी समाजमनात खोलवर रुजवला. त्यांच्या उपदेशाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की, त्यांच्या संपर्कात आलेले चोरसुद्धा चोरी सोडून माळकरी झाले. ही त्यांची अलौकिक किमया होती.
संत वामनभाऊ महाराजांना वाचासिद्धी होती, असे मानले जाते. त्यांच्या कीर्तनातून आणि विचारातून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत अध्यात्म पोहोचले. काळ बदलला, पिढ्या बदलल्या तरी त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
प्रसाद वितरण आणि अन्नदानाची परंपरा
गहिनीनाथ गडावर चालणाऱ्या अन्नदानाच्या परंपरेचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. प्रसाद वितरणाची परंपरा हे संत वामनभाऊ महाराजांचे मोठे वैशिष्ट्य असून, जिथे-जिथे सप्ताह होतो तिथे भाविकांसाठी पोटभर जेवणाची व्यवस्था केली जाते. पुढील सप्ताहासाठी विविध गावांतून मोठ्या प्रमाणावर मागणी असणे, ही संत वामनभाऊ महाराजांच्या कृपेची साक्ष असल्याचेही ते म्हणाले.
गडाचा विकास आणि पालखी मार्गासाठी ग्वाही
गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली असून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय, पंढरपूर येथे आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, पालखी मार्गाच्या विकासासाठीही लवकरच काम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर गहिनीनाथ गडाचा एक अनुयायी म्हणून येथील सर्व विकासकामांची जबाबदारी लोकप्रतिनिधींसह मिळून पार पाडली जाईल. दरवर्षी संधी मिळेल तेव्हा गहिनीनाथ गडावर येऊन संत वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद घेत राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्कारांची शिदोरी: पंकजा मुंडे
यावेळी बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वामनभाऊंच्या विचारांची महती सांगितली. त्या म्हणाल्या की, संत वामनभाऊ महाराजांनी कठीण काळात माणसाला माणूस बनवण्याचे संस्कार समाजाला दिले. सत्य, एकोपा आणि सेवाभावाचे हे संस्कार आजही महाराष्ट्रभर जिवंत आहेत. कष्टकरी, गरीब आणि वंचित समाज वामनभाऊ महाराजांचे विचार विसरलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गहिनीनाथ गडाच्या विकासाला भव्य स्वरूप मिळत असून, हे कार्य भाविकांच्या श्रद्धेला साजेसे ठरत आहे. सामान्य माणसाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी केलेले हे कार्य निश्चितच लोकांचा आशीर्वाद मिळवून देणारे आहे.
या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.