पाटोदा, ८ जुलै (प्रतिनिधी):
राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने सन २०२५-२६ साठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेमुळे प्रयोगशील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादकतेसाठी गौरवण्यात येईल, ज्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेल आणि ते नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. यातून राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडेल आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन मिळेल, असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
राज्याच्या कृषी विभागामार्फत अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांसाठी ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकरी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेत खरीप हंगामातील ११ आणि रब्बी हंगामातील ०५ अशा एकूण १६ पिकांचा समावेश आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर विजेत्यांची निवड केली जाईल, ज्यासाठी शेतकऱ्यांनी प्राप्त केलेली उत्पादकता आधारभूत मानली जाईल.
पीक स्पर्धेतील पिके:
- खरीप पिके: भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल.
- रब्बी पिके: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस.
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख:
- खरीप हंगाम:
- मूग व उडीद पिकासाठी: ३१ जुलै २०२५
- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल: ३१ ऑगस्ट २०२५
- रब्बी हंगाम: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस: ३१ डिसेंबर २०२५
पीकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिसाचे स्वरूप:
अ.क्र. | स्पर्धा पातळी | सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये | ||
---|---|---|---|---|
पहिले | दुसरे | तिसरे | ||
१ | तालुका पातळी | ५,००० | ३,००० | २,००० |
२ | जिल्हा पातळी | १०,००० | ७,००० | ५,००० |
३ | राज्य पातळी | ५०,००० | ४०,००० | ३०,००० |
कृषी विभागाने राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.