बीड, ९ जुलै (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि भांडवलदारधार्जिण्या धोरणांच्या निषेधार्थ आज, बुधवार, ९ जुलै रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामस्थांनी जोरदार पाठिंबा दर्शवला. १० केंद्रीय कामगार संघटनांनी विविध शेतकरी आणि ग्रामीण कामगार संघटनांच्या समन्वयाने पुकारलेल्या या देशव्यापी संपाला प्रतिसाद देत, लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांनी तीव्र निदर्शने केली.
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी
लिंबागणेश येथील मुख्य प्रवेशद्वारावर जमलेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, “कामगार एकजुटीचा विजय असो”, “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ, ॲड. गणेश वाणी, विक्रांत वाणी, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, रमेश गायकवाड, अशोक जाधव, पांडुरंग वाणी, सुरेश निर्मळ, भालचंद्र गिरे, आश्रुबा गिरे, सतीश वायभट, संजय घोलप, चिंतामण ढास, गणपत घोलप, बालाजी निर्मळ, सय्यद अख्तर, संजय पावले, जनार्दन भोसले, अंकुश गायकवाड, ज्ञानोबा निर्मळ, बाजीराव दशमे, शेषेराव तागड, हरिभाऊ कदम, बाळू सोनावणे, चोखोबा निर्मळ, जनार्दन वाणी, सर्जेराव घरत, बाबासाहेब वायभट, भास्कर वाणी आदींसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख, गोविंद बडे, पो. ह. सतीश राऊत आणि सुदाम शेलार हे पोलिस अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी आत्महत्या आणि कामगारांच्या हक्कांवर गदा: डॉ. गणेश ढवळे
यावेळी बोलताना डॉ. गणेश ढवळे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “केंद्र सरकारच्या कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग) कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा यांसारख्या शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, कामगार संघटनांनी संसदेने मंजूर केलेल्या ४ कामगार संहितांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होत असून कामगार संघटनांची ताकद कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला.”
डॉ. ढवळे यांनी पुढे असेही नमूद केले की, “केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी आणि भांडवलदार धार्जिण्या धोरणांविरोधात लिंबागणेशकरांमध्ये तीव्र संताप असून, या विरोधात निदर्शने करत ‘भारत बंद’ला पूर्ण समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले.”