बीड, १० जुलै (प्रतिनिधी) :बीड शहर आणि ग्रामीण भागांमध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतात. या कार्यक्रमांची शोभा वाढवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, चौकाचौकात, रस्त्यांवर, लोखंडी दुभाजकांवर आणि पथदिव्यांच्या खांबांवर विविध रंगांचे व आकारांचे ध्वज लावले जातात. मात्र, या ध्वजांची योग्य ती देखभाल न केल्याने ते फाटतात, जीर्ण होतात किंवा काही वेळा पायदळी तुडवले जातात. यामुळे त्या ध्वजांचे प्रतीकात्मक महत्त्व कमी होते, असे निरीक्षण सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी नोंदवले आहे.
डॉ. ढवळे यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, ध्वजांची विटंबना हे कायद्याचे उल्लंघन असून, त्यामुळे सामाजिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. “ध्वज हे महापुरुषांच्या अस्मितेचे, त्यागाचे आणि बलिदानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांची कोणत्याही प्रकारे अवहेलना होणार नाही, याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले.
पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी – डॉ. ढवळे यांची मागणी
महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर, डॉ. ढवळे यांनी पोलिस प्रशासनाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यांच्या मते, पोलिस प्रशासनाने प्रत्येक सार्वजनिक उत्सव समितीला ध्वज व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करताना लेखी स्वरूपात सूचना द्याव्यात.
या सूचनांमध्ये जयंती कार्यक्रम संपल्यानंतर ठराविक कालावधीत जीर्ण झालेले, फाटलेले, खाली पडलेले किंवा दुर्लक्षित झालेले ध्वज तातडीने काढून घेण्याची जबाबदारीही निश्चित करावी, असे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे. यामुळे ध्वजांचा सन्मान राखला जाईल आणि कोणत्याही प्रकारची विटंबना टाळता येईल, असे त्यांचे मत आहे.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर (सामाजिक कार्यकर्ते) यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले असून, प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.